नागपूरमध्ये पहाटे भीषण आग; ४ घरे आणि २ गोदामे जळून खाक

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
नागपूर:
nagpur massive fire शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या यशवंत स्टेडियम परिसरातील संगम चाळीत सोमवारी पहाटे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत चार घरे आणि दोन लहान गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
 

नागपूर आग
 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ ते ४:३० वाजताच्या दरम्यान रहिवासी गाढ झोपेत असताना एका घरातून आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि शेजारील घरांनाही वेढले. ज्वाळा पाहून चाळीतील रहिवाशांनी आरडाओरडा केला आणि जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः राख झाले होते.
या आगीत टेलिव्हिजन, फ्रिज, कुलर, पंखे, कपडे, अन्नधान्य यांसह दैनंदिन वापराच्या वस्तू जळून खाक झाल्या. तसेच दोन दुचाकी आणि दोन सायकलींचेही नुकसान झाले.
या दुर्घटनेत योगेश ठाकूर, सुरेश ठाकूर, बसंती ठाकूर, राजेंद्र सिंग संदक, मनोज यादव आणि कांचन पटेल यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
धंतोली पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून तपास सुरू केला असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.