अचलपूर,
police-march-ending-recovery : परतवाडा - बैतूल महामार्गावर मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पोलिस तपासणी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत वाहनचालकांना अडवून कागदपत्रांची तपासणी केली जात असली, तरी ही मोहीम नेमकी नियम पालनासाठी की ‘मार्च एंडिंग’च्या नावाखाली वसुलीसाठी, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बहिरम -—बैतूल मार्गावर बॅरिकेट्स लावून प्रत्येक वाहन थांबवण्यात येत होते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्राधान्याने थांबविण्यात येत होते. वाहन विमा, परवाना, आरटीओ कर आदी कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरवर्षी फेब्रुवारी संपताच अशा मोहिमा अधिक तीव्र होतात, असा स्थानिकांचा आरोप आहे. ‘मार्च एंडिंग’च्या पृष्ठभूमीवर महसूल वाढवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा रस्त्यावर ऐकू येत होती. याच दरम्यान एक गंभीर प्रकार समोर आला. मालवाहू ट्रॅक्टरमध्ये नियमबाह्यरीत्या प्रवासी वाहतूक होत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही संबंधित वाहनावर केवळ दंड आकारून त्याला पुढे जाऊ देण्यात आल्याची माहिती मिळाली. नियमांचे उघड उल्लंघन थांबवण्याऐवजी केवळ दंड वसुलीवर भर दिला जात असल्याचा आरोप यामुळे अधिकच तीव्र झाला आहे.
दुसरीकडे, अनेक दुचाकी चालक हेल्मेटविना प्रवास करताना दिसत होते, तसेच काही वाहनांवर नियमबाह्य नंबर प्लेट्सही होत्या. मात्र अशा स्पष्ट उल्लंघनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. यामुळे कारवाई निवडक होत असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तपासणीदरम्यान एका दुचाकीस्वाराने तातडीने रुग्णालयात जाण्याची विनंती करूनही त्याला तत्काळ मार्ग देण्यात आला नाही, असा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
//जुळ्यात शहरात वाहतुकीचे तिनीतेरा
परतवाडा,—अचलपूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुजरी बाजार, दुराणी चौक, जयस्तंभ चौक, बस स्थानक परिसर, विदर्भ मिल चौक आदी ठिकाणी रोजच वाहतूक कोंडी, राँग साईड ड्रायव्हिंग, ओव्हरलोडिंग आणि वेगमर्यादा भंग यासारखे प्रकार सुरू असतानाही त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. वाहतूक शिस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या या मोहिमा खरोखरच सुरक्षिततेसाठी आहेत की महसूल वसुलीचे साधन बनल्या आहेत? नियम सर्वांसाठी समान असतील, तर त्यांची अंमलबजावणीही तितक्याच कडक आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. सदर माहितीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलिस अधिकारी नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रेस नोट पाठवतो असे सांगितले.