राजलक्ष्मी मल्टीस्टेटच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

प्राऊटिस्ट ब्लॉकचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निवेदन

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
rajalakshmi-multistate : येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यामार्फत केंद्रीय सहाकार मंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे. प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
 
 
 
y17March-Rajlaxmi
 
 
 
आंदोलनादरम्यान राजलक्ष्मी मल्टीस्टेटमधील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे यांना तातडीने निलंबित करणे, राजलक्ष्मी सोसायटी बरखास्त करणे, राजलक्ष्मी सोसायटीची कर्जदारांकडून आत्महत्येस प्रवृत्त करणारी जीवघेणी पठाणी वसुली थांबवा व आरबीआयच्या निकषांनुसार कारवाई करावी आणि राजलक्ष्मी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, माजी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी.
 
 
यापूर्वी 13 जून 2022 रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे राजलक्ष्मीविरुद्ध अन्यायग्रस्त नागरिकांनी केलेल्या तक्रारी व सहकार आयुक्तांच्या अंकेक्षण अहवालामध्ये नमूद गैरव्यवहार तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या तपासणी अहवालानुसार प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने जॉईन्ट सेक्रेटरी अ‍ॅन्ड सेंट्रल रजिस्ट्रार, कोऑपरेटिव्ह सोसायटी, नवी दिल्ली येथे पाठपुरावा केलेला आहे.
 
मानहानीचा दावा दाखल करणार
 
 
प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया या संघटनेच्यावतीने मधुकर निस्ताने यांनी राजलक्ष्मी मल्टीस्टेट विरोधात धरणे आंदोलन केल्याची माहिती मिळाली. वास्तविक निस्ताने हे राजलक्ष्मी पतसंस्थेचे सभासद नसून त्यांच्याकडे कुठलेही कर्ज नाही. जाणीवपूर्वक राजलक्ष्मी पतसंस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा लवकरच दाखल करण्यात येणार आहे.
- क्षितिज तायडे
व्यवस्थापकीय संचालक, राजलक्ष्मी पतसंस्था, यवतमाळ