आमगाव,
Encroachments शासकीय जागांवर कोणीही येऊन अतिक्रमण करावे, अशी परिस्थिती सध्या आमगाव शहरातील बनगाव परिसरात निर्माण झाली असून, यामुळे भविष्यात विकासकामांसाठी जागा शिल्लक राहणार नाही, अशी गंभीर भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बनगाव येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून भविष्यात त्यावर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन ‘बनगाव बचाव समिती’ने मुख्याधिकारी अस्मिता सूर्यवंशी यांना सोमवार 16 मार्च रोजी सादर केले. दरम्यान, वाढत्या अतिक्रमणांमुळे आमगाव नगरपरिषद प्रशासन सतर्क झाले असून, लवकरच या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील बनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बैल बाजार, देशी दारू व बार दुकान परिसर तसेच मुख्य बाजाराकडे जाणार्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी तर अतिक्रमणधारकांनी शासकीय जागेवर पक्के टीन शेड उभारून जागा बळकावल्याचे समोर आले आहे. Encroachments या अतिक्रमणांमध्ये काही धनाढ्य व्यक्ती व राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांचा सहभाग असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. त्यामुळेच कारवाईला विलंब होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.‘बनगाव बचाव समिती’ने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत केवळ अतिक्रमण हटवण्यावर न थांबता संबंधित अतिक्रमणधारकांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आता नगरपरिषद प्रशासन राजकीय दबावाला बळी न पडता खरोखरच बुलडोझर कारवाई करणार का? आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का, याकडे परिसरवासीयांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना दिनू थेर, धनलाल शिवशंकर, दिनेश पुंडे, पाथोडे, भांडारकर, थेर आदी उपस्थित होते.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी वाढून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमगाव नगरपरिषद Encroachments प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत आहेत.