गोतस्कराचा दोन वाघांनी पाडला फडशा

बारुखेडा जंगलातील घटना

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
धारणी, 
two-tigers-attack-cow-smuggler : गेल्या आठवड्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वानच्या जंगलातून वाघाने शेतशिवारात प्रवेश करून सहा पाळीव जनावरांची शिकार केली होती, म्हणून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वान परिक्षेत्र कार्यालयाने कोणतेही उपाय न केल्याने सोमवारी एका गोवंश तस्कराला आपला जीव गमवावा लागला. तलई व बारूखेडाच्या जंगलातून अवैधपणे गोवंशांची वाहतूक होत असताना गुलजार महल्ले नावाच्या इसमावर दोन वाघांनी हल्ला करून ठार मारल्याने एकच दहशत पसरलेली आहे. शिकार झाल्यावर आगीत पूर्ण शरीर जळालेले होते, हे विशेष.
 
 
tiger
 
धारणीपासून ७० कि. मी. अंतरावरील धुळघाट-अकोट प्रतिबंधित मार्गावर बारुखेडालगतच्या संरक्षित जंगलातून गोवंशाची वाहतूक करणार्‍या गुलजार फत्तू महल्ले (६०) रा. झरी बाजार हा धारणीकडून गोवंश घेऊन रविवारच्या रात्री उशीरा अकोटकडे जात असताना दोन अस्सल पट्टेदार वाघांनी हल्ला केला. गुलजार जागीच ठार झाला, पण त्याचा सोबती पळून गेल्याची माहिती आहे. वान परिक्षेत्र अधिकारी सुधीर आंबेकर यांना माहिती मिळताच ते पथकासह तेथे पोहोचले. घटनास्थळ चिखलदरा पोलिस स्टेशन अंतर्गत असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
 
गुलजारसोबत असलेला अर्जुन सितबा मोरे रा. दिवान झरी ता. तेल्हारा, अकोला हा जंगलातून पळून गेला. वन परिक्षेत्र अधिकारी एस. ए. आंबेकर यांनी बारुखेडा संरक्षण कुटी येथे माहिती देऊन पुढील कारवाई केली. अर्जून मोरे यानेच आपला जीव वाचविण्यासाठी आग लावल्याचे कबूल केले. एका माहितीनुसार, धारणी तथा जवळच्या देडतलाई व तुकईखेड (म. प्र.) येथून चोरट्या स्वरुपात धुळघाटसाठी वानच्या सुरक्षित जंगलातून गोवंशाची वाहतूक नियमित होत असते. गुलजारचे मृत शरीर चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेऊन विस्तृत तपास सुरू केलेला आहे.
 
 
क्षेत्र संचालक आदर्श रेड्ड्ी (अमरावती), उपवनसंरक्षक आर. एस. होलिया, सहा. वनसंरक्षक जी. पी. टेकाडे यांच्या मार्गदर्शनात आरएफओ आंबेकर, वनपाल घुगे, भावे पुढील तपास करत आहेत.