सिनेटाईल पाठलाग करून १९ सिलेंडर जप्त

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
समुद्रपूर, 
cylinders-seized : अमेरिका, इजराईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या नावाखाली सिलेंडरचा काळाबाजार होत असून ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील नांद येथील भारत गॅस एजन्सीकडून गिरड येथे दुसर्‍यांदा सिलेंडर वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. गिरड-सिर्सी मार्गावर पोलिस व पुरवठा विभागाने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून वाहनातील १९ रिकामे सिलेंडर जप्त केले आहे.
 
 
 
jj
 
 
 
नागपूर जिल्ह्यातील नांद येथील भारत गॅस एजन्सीकडून अवैधरित्या गिरड येथे ९६५ रुपये किमतीचे सिलेंडर तब्बल ११०० रुपयांत विक्री करीत असल्याचे १५ मार्च रोजी धकादायक प्रकार हिमांशू डेकाटे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओतून उघडकीस आला होता. यासंबंधी पुरवठा अधिकारी कमलेश कुमरे हे चौकशी करीत असतानाच आज बुधवार १८ रोजी याच एजन्सीकडून सिलेंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पुरवठा विभागाला मिळताच पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला. गिरड-सिर्सी मार्गावर एम. एच. ४० ए. के. १८२२ क्रमांकाचा सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र, यावेळी कारवाईची भनक लागताच चालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहन गिरडकडे वळविण्यात आले.
 
 
हे वाहन गॅस पॉईंट नसलेल्या गिरड येथील सुरेश गिरडे यांच्या घरी थांबविण्यात आले. पुरवठा विभागाचे अधिकारी व पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता या वाहनात तब्बल १९ रिकामे सिलेंडर आढळून आले. यासंबंधी वाहन चालक विष्णू घरत यास विचारपूस केली असता ग्राहकांचे खाली सिलेंडर एजन्सी पॉईंटवर घेऊन जाऊन ते भरून आणले जाणार होते, असे त्याने सांगितले. यावेळी तालुका पुरवठा अधिकारी कमलेश कुमरे यांनी पंचनामा करून ४१ हजार ८०० रुपयांचे १९ रिकामे सिलेंडर जप्त केले. सदर गॅस सिलेंडर समुद्रपूर येथील गॅस पॉईंटवर जमा करण्यात आले आहे.
 
 
नांद येथील भारत गॅस एजन्सीकडून गिरड येथील भारती घरत यांना गॅस पॉईंट दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी त्यांचे कागदपत्रे सुद्धा घेतली असून याबाबत शहानिशा करण्यात येईल. त्यांना ७ सिलेंडरच किंवा १०० किलो गॅसची परवानगी दिली आहे. मात्र, पॉईंट सोडून सुरेश गिरडे यांच्या घरी १९ रिकामे सिलेंडर आढळून आले आहे. त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. यासंबधी चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा अधिकारी कमलेश कुमरे यांनी दिली.