मुंबई/संगमनेर
acid attack Sangamner अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे का, असा सवाल उपस्थित केला. सरकारने अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस तपासाबाबत माहिती देताना सांगितले की, घटना ग्रामीण भागात घडल्याने परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हल्लेखोर हा स्थानिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पोलिसांकडून जलदगतीने तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल आणि त्याला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, अशा गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या आमदार acid attack Sangamner मनीषा कायंदे यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनाला धारेवर धरले. कोणताही आरोपी असला तरी त्याला शोधून काढलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. अॅसिडसारखा घातक पदार्थ आरोपीपर्यंत कसा पोहोचला, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. सहावीत शिकणाऱ्या मुलीवर असा विद्रूप करणारा हल्ला होणे अत्यंत गंभीर असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत हा मुद्दा सोडणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली.दरम्यान, जखमी मुलीवर उपचार सुरू असून ती मानसिकदृष्ट्या घाबरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. संगमनेर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक तसेच मोबाईल सेल या सर्व यंत्रणा हल्लेखोरांच्या शोधासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.या घटनेमुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून, अॅसिड हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आरोपी गावातीलच असण्याची शक्यता
वडगावपान येथे शाळकरी acid attack Sangamner मुलीवर झालेल्या भीषण अॅसिड हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग देण्यासाठी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्यामागे गावातीलच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुलगा असू शकतो, असा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांना आरोपीला पकडण्यासाठी सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
मंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीने तिच्याजवळ येत एका वस्तीची चौकशी केली. मुलीने अशी कोणतीही वस्ती येथे नसल्याचे सांगितल्यानंतर हल्लेखोराने अचानक अॅसिडची बाटली काढून तिच्या चेहऱ्यावर फेकली. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग गंभीररीत्या भाजला असून डोळ्यालाही मोठी दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असली तरी घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. हल्लेखोराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर सुरू केला असून मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांची acid attack Sangamner दहा पथके तैनात करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि इतर यंत्रणा तपासात सहभागी आहेत. मंत्री विखे पाटील यांनी स्वतः अतिरिक्त पोलिस अधीक्षकांशी सतत संपर्क ठेवला असून तपासावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. “आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पकडलेच पाहिजे. आम्ही पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि आज सायंकाळपर्यंत आरोपी गजाआड असेल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून तपास जलदगतीने सुरू असून लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.