आचार्य विनोबा भावे यांचे स्वीय सहाय्यक बालविजय अनंतातविलीन

*ब्रह्मविद्या मंदिर पवनार येथे अखेरचा श्वास

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
वर्धा,
wardha-news : आचार्य विनोबा भावे यांचे दीर्घकाळ खाजगी सचिव आणि सहकारी असलेले बालभाई उर्फ बालविजय (मनोहर टेंभेकर) यांचे आज १८ रोजी दुपारी १२.३० वाजता पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमात निधन झाले. त्यांनी वयाची १०० वर्षे २६ फेब्रुवारी रोजी पुर्ण केली. सायंकाळी ५ वाजता आश्रम परिसरातच त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
 
 
jlk
 
 
 
२६ फेब्रुवारी १९२६ रोजी भंडारा येथे जन्मलेले बालभाई यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून ’एम.एस्सी. भूशास्त्र’ विषयात सुवर्णपदक प्राप्त केले होते. १९५३ मध्ये ते विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारले आणि स्वतःला सर्वोदय चळवळीत झोकून दिले. पदयात्रेत ते विनोबांचे सावलीसारखे होते. विनोबांचा पत्रव्यवहार, प्रवास नियोजन, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि चळवळीच्या धोरणात्मक बाबी सांभाळल्या. विनोबांनी त्यांना बालविजय असे नाव दिले. त्यांनी विनोबांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आणि विनोबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते त्यांच्याच सान्निध्यात राहिले.
 
 
विनोबांच्या निधनानंतर बालभाईंनी आचार्य-कुल आणि खादी मिशनच्या माध्यमातून गांधीवादी विचारांचा वारसा पुढे नेला. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भूदान ग्रामडन संपत्तीदान, सर्वोदय पत्र, शांतीसेन, आचार्यकुल, खादी मिशन आणि गो रक्षा सत्याग्रह यासारख्या चळवळींना शांततामय व अहिंसक मार्गाने हाताळले. सन १९९८ मध्ये मध्यप्रदेश शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार आणि महाप्राण अहिंसा प्रशिक्षण पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. त्यांनी सर्व पुरस्कार व पारितोषिकाची रक्कम विविध संस्थान दान केली.