बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी फिरवली पाठ

*प्रकल्पग्रस्तांची फसवणूक, उपोषणाचा इशारा

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
सेलू, 
bor-tiger-project : बोर धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि १०० कोटी रुपयांच्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी स्वतः उपसंचालकांनी नोटीस देऊन बोलावले असताना ऐनवेळी अधिकारी अनुपस्थित राहिल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यत होत आहे. प्रशासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.
 
 
bor-tiger-project
 
 
 
बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी राष्ट्रीय सल्लागार शंकर प्रकाश पाणबुडे आणि त्यांच्या संघटनेला १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता चर्चेसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याची लेखी नोटीस दिली होती. बोर धरण प्रकल्पग्रस्तांना १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत ही चर्चा होणार होती.
 
 
नोटीसमध्ये दिलेल्या वेळेनुसार २० प्रकल्पग्रस्त कार्यालयात जमा झाले. मात्र, ज्यांनी स्वतः चर्चेसाठी बोलावले ते उपसंचालक मंगेश ठेंगडी अनुपस्थित होते. तसेच विभागाचा कोणताही जबाबदार अधिकारी तेथे फिरकला नाही. कार्यालयात केवळ लिपिक गोंडाने आणि खोब्रागडे उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडे या गंभीर विषयावर चर्चा करण्याचा कोणताही अधिकार किंवा तयारी नव्हती.
तासन्तास वाट पाहूनही अधिकारी न आल्याने उपस्थित प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटला. प्रशासनाने नोटीस देऊन आम्हाला बोलावले आणि स्वतःच दांडी मारली. ही आमची शुद्ध फसवणूक आहे, अशा भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यत केल्या.
 
 
सदर प्रकरणात मुख्य वनसरक्षक वनबल नागपूर लक्ष्मी ए. यांनी दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही, असा आरोप प्रकल्पग्रस्त संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे. यावर काय कारवाई करतात, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरण आणि अनास्थेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप असून, मागण्या मान्य न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सल्लागार शंकर पाणबुडे व समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.