अग्रलेख...
dharma-rakshati-rakshit :
‘धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।’
धर्म हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यांसमोर केवळ पूजा, प्रार्थना, उपासना किंवा आचार-विचार येतात. परंतु, भारतीय परंपरेत धर्म हा केवळ श्रद्धेचा किंवा कर्मकांडाचा विषय नाही; तो आपल्या समाजरचनेचा कणा आहे, तो कर्तव्याचा मार्ग आहे आणि नैतिकतेचा आधारही. या श्लोकात मांडलेला विचार अत्यंत साधा आहे. तो असा की, जो धर्माचा नाश करतो, धर्म त्याचाच नाश करतो; आणि जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. त्यामुळे धर्माचे पालन करणे म्हणजे केवळ स्वतःच्या श्रद्धेचे रक्षण नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या संतुलनाचे रक्षण करणे होय. धर्माचा अर्थ विकृत स्वरूपात मांडण्याचे, त्याचा वापर स्वार्थासाठी करण्याचे आणि समाजात फूट पाडण्यासाठी त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढताना दिसतात. अशा वेळी सरकारने हस्तक्षेप करणे हा अधिकारांचा नव्हे, तर कर्तव्याचा विषय ठरतो.

या पृष्ठभूमीवर विधिमंडळात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक-2026 कडे सरकार बजावत असलेल्या सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. एखादी व्यक्ती धार्मिक आहे किंवा ती एखादा धर्म मानते, याचा लौकिक अर्थ ती व्यक्ती चांगली वागते किंवा पूजापाठ करणारी आहे, असा घेतला जाऊ शकते. खèया अर्थाने धर्म पालनाचा अर्थ होतो चांगले वर्तन आणि चांगल्या गोष्टींचे संवर्धन. धर्म म्हणजे सत्य, कर्तव्य, संयम, न्याय आणि समन्वय यांचे मिश्रण. धर्माच्या नावाखाली फसवणूक, दबाव, भीती किंवा प्रलोभन यांचा वापर केला जातो, तेव्हा तो धर्म नव्हे तर अधर्म बनतो. भारतीय परंपरेत करुणा आणि सहिष्णुता यांना महत्त्व दिले गेले आहे, पण त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवणही दिली आहे. म्हणूनच, समाजात जेव्हा धर्माच्या नावाखाली चुकीचे कृत्य घडते, तेव्हा त्याला आळा घालणे ही देखील धर्माचीच सेवा ठरते. नवे विधेयक ही त्या प्रकारची धर्म सेवा आणि समाज सेवा होय.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विविध धर्म, संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात. ती आपली ताकद आहे. मात्र, या विविधतेचा गैरफायदा घेऊन कुणी लोकांची दिशाभूल करीत असेल, दबाव टाकत असेल किंवा आमिषे दाखवून त्यांच्या श्रद्धावंत मानसिकतेचा फायदा घेत असेल तर त्यातून त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आघात होतो आणि समाजाच्या संतुलनालाही धक्का बसतो, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतर हा वैयक्तिक निर्णय नसून परिस्थितीचा परिणाम असतो, हे सांगणाèया अनेक घटना आपल्या भोवताली घडत असतात. भीती, फसवणूक किंवा प्रलोभन यांचा परिणाम म्हणून धर्मांतर केल्याची उदाहरणेही आहेतच. तसे घडू नये यासाठी यासंदर्भात स्पष्ट कायदेशीर चौकट असणे अत्यावश्यक होते. ती उणीव नव्या कायद्याने भरून निघणार आहे. भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे. पण त्याच वेळी, हे स्वातंत्र्य कुणाच्या फसवणुकीचे साधन बनू नये, याचीही काळजी घेणेही आवश्यक आहे. नवीन विधेयक याच संतुलनावर आधारित आहे. ते कोणाच्याही श्रद्धेवर बंधने घालत नाही; उलट खèया अर्थाने ती स्वतंत्र राहावी यासाठी संरक्षण देणारे हे विधेयक आहे. एखाद्या व्यक्तीने पूर्ण विचारपूर्वक, कोणत्याही दबावाशिवाय आपला धार्मिक मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला कुणीही अडवणार नाही. मात्र, तो निर्णय दबावाखाली घेतला जात असेल, तर त्याला थांबविणे ही सरकारची जबाबदारी ठरते. त्याची तजवीज करणारा हा कायदा आहे.
वरकरणी धर्म बदलल्याने फार मोठे नुकसान किंवा फायदा होतो, असे लोकांना वाटत नाही. प्रत्यक्षात अनेकांना धर्म परिवर्तनाच्या नंतर प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचे पालन-पोषण ज्या वातावरणात झालेले असते, त्याहून अगदी वेगळ्या वातावरणात, वेगळ्या समुदायात जुळवून घेणे सोपे नाही. शिवाय, काही वेळा आमिष किंवा जुलूम या घटनांच्या मागे असतो, हेही दिसते. त्यामुळेच अशा निर्णयांसाठी प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे. ती स्वातंत्र्याच्या नियंत्रणासाठी नाही. ती आहे-संबंधित व्यक्तीने धर्म परिवर्तनाचा निर्णय पूर्णपणे स्वेच्छेने घेतलेला आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी. त्यामुळे कुणी कितीही बोंबा ठोकत असले, तरी हा कायदा कुणाची अडवणूक करण्यासाठी नव्हे, तर भाबड्या माणसांची फसवणूक होऊ नये, यासाठी आणला जात आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
या विधेयकातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबाशी संबंधित तरतुदी. धर्मांतराच्या घटनांमुळे अनेकदा कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होतो. विशेषतः अशा घटनांमध्ये फसवणूक किंवा दबाव असतो, तेव्हा त्याचे परिणाम गंभीर होतात. अशा स्थितीत मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाचा पाया असलेल्या कुटुंबव्यवस्थेची स्थिरता टिकविण्यासाठी अशा तरतुदींची गरज होती. या कायद्यामुळे मुलांचे हित, त्यांचे अधिकार आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक विचारात बदल घडवून आणण्याचा संबंध देशाची वीण विस्कटून टाकण्याच्या उद्देशाशी असेल तर त्याला आळा घातलाच पाहिजे. कायद्याचा उद्देश केवळ मार्गदर्शन करणे नसतो. आवश्यक तेथे प्रतिबंध घालणे हेही कायद्याचे काम आहे. त्यासाठीची व्यवस्था या कायद्यात आहे. जे लोक प्रामाणिकपणे वागतात, त्यांना या कायद्याची भीती वाटण्याचे कारण नाही. पण जे लोक धर्माच्या नावाखाली चुकीचे कृत्य करतात, त्यांच्यासाठी ‘ही भूमी सहिष्णु असली तरी दुर्बल नाही’ असा या विधेयकाचा सांगावा आहे. आजच्या काळात अनेक गोष्टी वैयक्तिक पातळीवर न होता संघटित पद्धतीने घडतात. त्यामुळे अशा गैरप्रकारांमध्ये संस्थांचा सहभाग असेल, तर त्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे.
या कायद्यातील तरतुदी अशा प्रकारच्या रॅकेट्सना रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे- हे विधेयक महाराष्ट्र सरकारने अचानक आणलेले नाही. त्यामागे सखोल अभ्यास, विविध राज्यांतील अनुभव आणि कायदेशीर विश्लेषणाचे पाठबळ आहे. हे विधेयक केवळ भावनिक प्रतिक्रियेचा भाग म्हणून आलेले नाही. ते विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. समाजात दीर्घकालीन स्थिरता निर्माण करण्यासाठी अशा कायद्यांची गरज असते. त्यामुळे समस्यांवर प्राथमिक उपाय करणे शक्य होते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारीही होत असते. शासकाने एका धर्माच्या मागे उभे राहू नये, हे आपल्या राज्य व्यवस्थेचे तत्त्व असले, तरी समाजाचे व्यापक हित सांभाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय त्यातलाच आहे. तो कोणत्याही एका धर्माच्या बाजूने किंवा विरोधात नाही. जे कुणी वाममार्गाने धर्म परिवर्तन घडवून आणत असतील त्यांना या कायद्याने चाप बसेल, हे मात्र नक्की. कोणताही मोठा निर्णय घेतला की त्यावर टीका होतेच.
काही जणांना हा कायदा व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणारा वाटू शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हा कायदा कुणाचेही स्वातंत्र्य मर्यादित करणारा नसून, स्वातंत्र्याचे संरक्षण करणारा आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्या स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या हक्कांवर आघात करण्यासाठी केला जात असेल, तर त्यावर नियंत्रण आवश्यक असते. या कायद्याच्या अधिष्ठानी असलेले तत्त्व हेच होय. धर्म हा कोणाच्याही स्वार्थासाठी वापरण्याचा विषय नाही. तो प्रत्येकाच्या अंत:करणाशी जोडलेला आहे आणि त्याचा आदर राखला पाहिजे. हा नवा कायदा त्या आदराचे संरक्षण करणारा, लोकांना आपल्या श्रद्धेप्रति अधिक सजग बनविणारा आणि समाजात विश्वासाची भावना निर्माण करणारा आहे. धर्म हा समाजाच्या अस्तित्वाचा पाया आहे. तो पाया पोखरण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्याला रोखले पाहिजेच. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या सूत्रातील आवाहन हेच आहे आणि त्यामुळे हे विधेयक पूर्णपणे योग्य व समर्थनीय आहे.