देवळी,
farmer गुढीपाडवा नवीन वर्ष घेऊन येत असल्याने मराठी माणसासाठी महत्त्वाचा तसेच शेतकर्यांसाठी हा सण केवळ आनंदाचाच नव्हे तर शेतीसाठी नव्या सालगड्याची सुरुवात असते. घरासमोर गुढी उभारली की शेतकर्याच्या मनातही नव्या हंगामाची आशा उभी राहते. पण, काळ बदललाय. तिथी प्रमाणे गुढी उभी राहतेय! पण, दीड लाख वर्षाला, गहू आणि सुट्ट्या देऊनही पण शेतावर काम करणारा गडी माणूस मात्र सापडत नाही.
पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी गावात एक वेगळीच लगबग असायची. शेतकरी गडी माणूस ठरवत असत. वर्षभरासाठी त्याला कामावर ठेवले जायचे. दाळ कांदा करायचे. गडी म्हणजे केवळ मजूर नव्हता तो शेतकर्याच्या कुटुंबाचाच एक सदस्य बनून मालकाच्या सुखा दुःखात सहभागी असायचा. पेरणी, खुरपणी, कापणीपासून जनावरांची देखभाल यासारखी सगळी कामे तो निष्ठेने करत असे. मात्र, आता ही परंपरा हळूहळू संपत चालली आहे. गावातील तरुण पिढीला शहराचे आकर्षण वाढले. तेथे जास्त मजुरी आणि शहरातील लखलख प्रकाश डोळ्यांना दिसत असल्यामुळे शेतीत काम करणारे हात कमी झाले. परिणामी आज शेतकर्यांना सर्वात मोठा प्रश्न पडला आहे आहे तो शेतावर
गडी मिळेल कुठून. गडी ठेवण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये रोख साल त्यासोबत गहू, राहण्याची सोय आणि ठरवून दिलेल्या सुट्ट्या देण्यास तयार आहे तरीही गडी माणूस मिळत नाही.farmer त्यामुळे शेतीचे बरेचसे कामे अडखळत आहेत. अनेक वेळा शेतकर्यालाच पहाटेपासून संध्याकाळपर्यंत स्वतः शेतात राबावे लागते.
यंत्र आले, ट्रॅटर आले पण शेती पूर्णपणे मशीनवर चालत नाही. अजूनही मातीशी झगडणारा माणूस लागतो. पण, गावाकडची माणसं शहराकडे वळली आणि शेती एकटी पडली हेच खरे शेतकर्यांचे दुःख आहे. गुढी तर उभारली पण यंदा शेती करायची कोणाच्या भरोशावर तरीही शेतकरी हार मानत नाही. तो प्रत्येक वर्षी गुढी उभारून तो पुन्हा नव्या जोमाने शेतीच्या कामाचा श्रीगणेशा करतो.