राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पाठपुराव्याने 2.5 कोटींचा निधी

तांडा वस्तीत उभारणार भव्य वाचनालये

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
indranil-naik : पुसद मतदारसंघातील तांड्यांच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे 10 गावांतील तांडा वस्तीमध्ये आधुनिक वाचनालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी एकूण 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
 

y18March-Indraneel-Naik 
 
 
 
या योजनेअंतर्गत प्रत्येक वाचनालयाच्या बांधकामासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे पुसद मतदारसंघातील 10 गावातील तांडा वस्त्यांमध्ये लवकरच भव्य वाचनालयांची उभारणी होणार आहे. प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
 
 
पुसद मतदारसंघ हा बंजारा समाजबहुल भाग असून या समाजाचे नेतृत्व मागील सुमारे 70 वर्षांपासून नाईक परिवार करत आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे, यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विशेष पुढाकार घेत हा निधी मंजूर करून घेतला आहे.
 
 
बंजारा समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे अनेकदा शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन गावपातळीवरच आभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वाचनालयांची उभारणी करण्यात येत आहे.
 
 
या वाचनालयांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आपल्या गावात राहूनच मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
 
 
दरम्यान, बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल समाजामध्ये राज्यमंत्री नाईक व नाईक परिवाराबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात या वाचनालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सर्व गावांत वाचनालय
 
 
तांड्यांच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी नाईक परिवार कटिबद्ध असून येत्या काळात पुसद मतदारसंघातील सर्व गावांत वाचनालय विकसित करण्याचे स्वप्न आहे.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक