नागपूर,
kavikulguru-kalidas-sanskrit-university : ज्ञान, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम अनुभवायला मिळाला तो कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक १८ मार्च रोजी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात संस्कृतची आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील उपयुक्तता आणि भगवद्गीतेचे जागतिक संदर्भातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री प्रा. गणपती यादव उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षणशास्त्र संकायाच्या अधिष्ठाता प्रा. ललिता चंद्रात्रे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेत, भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापनेच्या योजना मांडल्या.
या दीक्षांत समारंभात २०२४-२५ सत्रातील एकूण १४ हजार ५६४ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच ५४ सुवर्णपदके, १३ रोख पारितोषिके आणि १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली. यावेळी बहुभाषिक कवयित्री आशा भालचंद्र पांडे यांना मानद डी.लिट्. उपाधी देऊन गौरविण्यात आले. मराठी, हिंदी, संस्कृत आणि उर्दू भाषांतील त्यांच्या साहित्यसेवेचा हा सन्मान ठरला.
प्रमुख अतिथी प्रा. गणपती यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संस्कृत भाषा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही अत्यंत प्रासंगिक आहे.” भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आजच्या जागतिक संघर्षांमध्येही मनाला स्थैर्य आणि योग्य निर्णयक्षमता देते, असे त्यांनी नमूद केले. तसेच पाणिनीच्या अष्टाध्यायीचे संगणकीय विज्ञानाशी असलेले नातेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना समाजकल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले. संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेला जागतिक स्तरावर नेण्याचा विद्यापीठाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला आशा पांडे यांचे सुपुत्रद्वय राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, मोहन पांडे आणि त्यांचे कुटुंबीय, माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांच्यासह अनेक मान्यवर, विश्वविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर सहकारी इ उपस्थित होते.