प्योंगयांग
Kim Jong Un's party wins all seats उत्तर कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत देशाचे सर्वोच्च नेते नेते किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाने एकतर्फी विजय मिळवला आहे. अधिकृत माहितीनुसार या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला तब्बल ९९.९३ टक्के मते मिळाली असून सर्व ६८७ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी ठरले आहेत. मतदानाचे प्रमाणही जवळपास शंभर टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याचे सांगितले जात आहे. १५ मार्च रोजी झालेल्या या निवडणुकीत सर्वोच्च जनसभेसाठी प्रतिनिधी निवडले गेले असून नव्या सभेचे पहिले अधिवेशन राजधानी प्योंगयांग येथे होणार आहे. या अधिवेशनात देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची औपचारिक निवड आणि संविधानातील संभाव्य बदलांवर चर्चा होणार आहे.

या वेळी मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले असून जवळपास सत्तर टक्के प्रतिनिधींना नव्याने संधी देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, सत्ताधारी नेतृत्व अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या प्रतिनिधींमध्ये किम यो-जोंग आणि परराष्ट्र मंत्री चो सोन-हुई यांचाही समावेश आहे, तर किम यांचे निकटचे सहकारी जो योंग-वॉन यांना महत्त्वाच्या भूमिका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत आकडेवारीत अत्यल्प विरोधी मते नोंदवली गेली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर या निवडणुकांकडे औपचारिक प्रक्रिया म्हणूनच पाहिले जाते, कारण प्रत्यक्षात कोणतीही स्पर्धा नसल्याची टीका सातत्याने होत असते.