नागपुरात ‘जस्टा कॉसा" भव्य राष्ट्रीय महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर, 
justa-causa-grand-national-festival : न्यायालयीन वादविवाद, घटनात्मक मूल्ये आणि तरुणांच्या विचारशक्तीचा संगम अनुभवायला मिळणार आहे तो ‘जस्टा कॉसा २०२६’ या राष्ट्रीय विधी महोत्सवात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २० ते २२ मार्चदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची २३ वी आवृत्ती यंदा विशेष ठरणार असून, संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
ngp
 
 
देशभरातील सुमारे १०० अग्रगण्य विधी संस्थांचा सहभाग असलेला हा महोत्सव विद्यार्थ्यांना आपली कायदेशीर कौशल्ये सादर करण्यासाठी आणि समकालीन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उद्घाटन सोहळा २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
 
महोत्सवातील ‘अतिथी व्याख्यानमाला’ हे एक प्रमुख आकर्षण असून, न्यायमूर्ती ओक घटनात्मक मूल्ये आणि आधुनिक कायदेविषयक आव्हानांवर मार्गदर्शन करणार आहेत. २१ मार्च रोजी ‘द नागपूर डायलॉग’ या राष्ट्रीय युवा संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
 
याशिवाय ‘राष्ट्रीय युवा संसद’, ‘राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा’, ‘मूट कोर्ट स्पर्धा’ आणि ‘ट्रायल अ‍ॅडव्होकेसी’ यांसारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव मिळणार आहे. विधान भवनात होणारी युवा संसद आणि न्यायमूर्तींच्या उपस्थितीत होणाऱ्या मूट कोर्ट स्पर्धा हे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
 
२२ मार्च रोजी होणाऱ्या समापन समारंभाने या महोत्सवाचा भव्य समारोप होईल. एकूणच, ‘जस्टा कॉसा २०२६’ हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देत न्यायव्यवस्थेच्या सखोल आकलनाची दिशा देणारा ठरणार आहे.