युपीच्या यूट्यूबरच्या हत्येचा कट पाकिस्तानातून रचला

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
लखनौ,
plot to kill a YouTuber from UP उत्तर प्रदेशातील लोणी येथे राहणाऱ्या यूट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानमधून आखलेला कट असल्याचे तपासात समोर आले आहे. सुरुवातीला ही सुपारी सुहेल मलिक उर्फ रोमियो यांच्या टोळीला देण्यात आली होती आणि त्यासाठी अडीच लाख रुपये ठरवण्यात आले होते. मात्र, या टोळीला हल्ला करण्यात अपयश आल्याने पुढे ही जबाबदारी झीशान आणि त्याचा भाऊ गुलफाम यांच्याकडे सोपवण्यात आली. सुहेल मलिक हा मूळचा बिजनौर जिल्ह्यातील असून तो मेरठमध्ये राहत होता. १४ मार्च रोजी कौशांबी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पाच साथीदारांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवले. या चौकशीतून आणखी सुमारे डझनभर संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, स्थानिक पोलिसांसह विविध केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कसून चौकशी करत आहेत.
 
 
up
 
तपासात असे उघड झाले की, पाकिस्तानमध्ये बसलेला सरफराज उर्फ सरदार याने सलीमच्या हत्येची संपूर्ण योजना तयार केली होती. सुहेल आणि इराम नावाची एक महिला गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी एजंट म्हणून कार्यरत होते. सुहेलने कौशांबीतील एका गावात प्रशिक्षण केंद्र सुरू करून तरुणांना पैशांचे आमिष दाखवत हेरगिरी आणि दहशतवादी कृत्यांसाठी तयार केले जात होते. हे सर्व काम ऑनलाइन माध्यमातून पाकिस्तानस्थित हँडलरच्या मार्गदर्शनाखाली चालत होते.
 
 
हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी सुहेल टोळीतील सदस्यांनी सलीमच्या हालचालींची पाहणी केली होती, परंतु त्यावेळी तो त्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर झीशान आणि गुलफाम यांनी हल्ला केला, पण सलीमचा मृत्यू झाला नाही आणि तो गंभीर अवस्थेत उपचार घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने कारवाई करत झीशान आणि गुलफाम यांना चकमकीत ठार केले. वेळेवर कारवाई झाली नसती तर आणखी मोठ्या घटना घडल्या असत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याच चौकशीत काही संशयितांनी ईदनंतर एका विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करण्याची योजना असल्याचेही उघड केले आहे. सुहेल टोळीतील सदस्यांनी हेरगिरी आणि हिंसक कृत्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याने मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. २७ फेब्रुवारी रोजी सलीम वास्तिक यांच्यावर हल्ला झाला होता आणि सध्या त्यांची अचूक स्थिती स्पष्ट झालेली नाही.