salty water गावकर्यांना स्वच्छ पाणी मिळावे, किडनीसारख्या गंभीर आजारांपासून बचाव व्हावा, या उद्देशाने उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र आज केवळ शोभेची वस्तू ठरले आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी येथील नागरिकांना 8 ते 10 किमी अंतरावरील अहेरी तालुका मुख्यालयात जावे लागत आहे. मात्र गोरगरिबांना अहेरीवरून पाणी आणणे शक्य नसल्याने क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून सप्टेंबर 2022 मध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. गावातील नागरिकांना या केंद्रामुळे दूषित व क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा होती. मात्र महिना दीड महिन्यातच सदर जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले. या केंद्रातील सर्व यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे. देखभाल नसल्याने संपूर्ण प्रकल्प निष्क्रिय झाला आहे. क्षारयुक्त आणि दूषित पाण्यामुळे गावात किडनी आजारासह विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याची व्यथाही ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेकांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत असून काहींना तर जीव गमवावा लागला. अजूनही गावात काही रुग्णावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.salty water त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रशासनाने गावातील जलशुद्धीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.