संगमनेर,
sangamner-acid-attack अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका शाळकरी मुलीवर झालेल्या ऍसिड हल्लाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वडगाव पान येथे सहावीमध्ये शिक्षण घेणारी ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे शाळा सकाळीच भरत असल्याने ती लवकर घरी निघाली होती. मात्र वाटेतच एका अज्ञात तरुणाने अचानक तिच्या समोर येत तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले आणि क्षणार्धात तेथून पळ काढला.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. मुलीची गंभीर अवस्था पाहता तिला लगेच लोणी येथील प्रवरा नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. sangamner-acid-attack घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह पथकाने परिसराची नाकेबंदी केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून परिसरातील चित्रफितींची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
पीडित मुलगी अत्यंत गरिब कुटुंबातील असून तिचे वडील हयात नाहीत. sangamner-acid-attack आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या अमानुष कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर उभे आहे.