४ जिप्सी चालक, ४ गाईड १० दिवसांसाठी निलंबीत

*वन पर्यटनाचा नियम भंग भोवला

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
forest tourism rules सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी येतात. पण वनपर्यटनाच्या नियमांना बगल दिल्याने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील ४ जिप्सी व ४ गाईडला १० दिवसांकरिता निलंबीत करण्यात आले आहे.
 

forest tourism rules 
 
जंगल सफारी करते वेळी पर्यटक, जिप्सी चालक, गाईड यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पण १६ मार्चला सकाळच्या फेरीदरम्यान बोरधरण पर्यटन गेट येथून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात जंगल सफारीसाठी गेलेल्या एम. एच. ३२ ए. एच. १२३५, एम. एच. १२ यू. एम. ०१०१, एम. एच. ३२ ए. एच. १३०७, एम. एच. ३२ ए. एच. २४४१ क्रमांकाच्या जिप्सीच्या चालकाने तसेच विक्रम चिकराम, सचिन लोखंडे, मंगेश खोब्रागडे, मनोज वाघमारे या गाईडने पर्यटकांना वेळेपूर्वी पर्यटन क्षेत्रातून बाहेर काढले. शिवाय बफर क्षेत्रात ते पर्यटकांना घेऊन वावरताना आढळून आले. तर एक जिप्सी वाहन हे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीरा पर्यटन क्षेत्रात प्रवेश केल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार नियमांना धाब्यावर बसवणारा असल्याने जिप्सी व गाईड यांना २६ मार्चपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे.
नेहमीच मनमानी
बोरधरण येथून प्रत्येक दिवशी १५ तर अडेगाव येथून ८ जिप्सी जंगल पर्यटनासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सोडल्या जातात. पण, अडेगाव गेटवरून प्रवेश करणारे काही जिप्सी चालक व गाईड बहुदा मनमर्जीने वागत असल्याचे बोलले जात आहे. १६ मार्चला घडलेल्या प्रकारानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यापैकी काही गाईडने व्याघ्र दर्शन झाल्यावर त्याची माहिती इतरांना देण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात मोबाईलचा वापर केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
असे आहेत आरोप?
 
* एम. एच. ३२ ए. एच. १२३५ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड विक्रम चिकराम यांच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा २ तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 
* एम. एच. १२ यू. एम. ०१०१ क्रमांकाचा जिप्सी चालक तसेच गाईड सचिन लोखंडे याच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा आरोप ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
* एम. एच. ३२ ए. एच. १३०७ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड मंगेश खोब्रागडे यांच्यावर पर्यटकांसह निर्धारित वेळेपेक्षा दीड तास पूर्वी पर्यटन क्षेत्राबाहेर आल्याचा आरोप आहे.
 
* एम. एम. ३२ ए. एच. २४४१ क्रमांकाचा जिप्सी चालक व गाईड मनोज वाघमारे यांच्यावर पंधरा मिनीट उशीरा पर्यटन क्षेत्रात जंगल सफारीसाठी प्रवेश केल्याचा आरोप आहे.