तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : सहकार महर्षी भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी उमरखेड येथील जिन क्रमांक 2 मधील बांधकामावर घालण्यात आलेली स्थगिती अखेर उठविण्यात आली आहे. या संदर्भात सहकार विभागाकडून अधिकृत आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकामावर स्थगिती देण्यात आली होती. मात्र उमरखेड मतदारसंघाचे आमदार अभियंता किसन वानखेडे यांनी या स्थगितीविरोधात सहकार राज्यमंत्र्यांकडे पत्र देऊन पाठपुरावा केला.
आमदार वानखेडे यांनी पत्रामध्ये नमूद केले की, संबंधित सोसायटीच्या बांधकामावर देण्यात आलेली स्थगिती चुकीच्या पद्धतीने व गैरकायदेशीररीत्या देण्यात आलेली आहे, त्यामुळे ती तत्काळ रद्द करण्यात यावी.
या संदर्भात सहकार राज्यमंत्री यांनी अमरावती विभागीय सहनिबंधकांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी आदेश काढून या बांधकामावरील स्थगिती उठविण्यात आल्याचे कळविले आहे.
त्यामुळे आता सहकार महर्षी भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या जिन क्र. 2 मधील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील कामे सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेला परवानगी देण्यात आली आहे.