दिल्ली वार्तापत्र
rajya sabha election results राज्यसभेच्या 37 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली, खरं म्हणजे यातील 26 उमेदवार अविरोध निवडून आले. यात रालोआ आणि इंडिया आघाडीच्या प्रत्येकी 13 उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे फक्त 11 जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. प्रत्यक्षात ज्या 11 जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली, त्यातील 9 जागा रालोआला तर दोन जागा विरोधी पक्षांना मिळाल्या. यात भाजपाला सर्वाधिक म्हणजे 5 तर त्याच्या मित्रपक्षांना 4 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि बिजू जनता दलाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. 37 पैकी 22 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या, तर 15 जागांवर इंडिया आघाडीला समाधान मानावे लागले. रालोआच्या 22 जागांमध्ये भाजपाच्या सर्वाधिक म्हणजे 13 जागांचा समावेश आहे, भाजपाच्या मित्रपक्षांनी 9 जागा जिंकल्या. विरोधकांच्या 15 जागांत काँग्रेसच्या 6, तृणमूल काँग्रेसच्या 4 तर द्रमुकच्या 3 जागांचा समावेश आहे. शरद पवार विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक जागा मिळाली.
अपेक्षेप्रमाणे बिहार आणि ओडिशा या दोन राज्यात क्रॉस व्होटिंग झाली. त्याचा फायदा भाजपा आणि भाजपा समर्थित उमेदवारांना मिळाला. मागील राज्यसभा निवडणुकीत हरयाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस व्होटिंग झाले होते. हरयाणात यावेळीही निवडणुकीतील मतदानाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. पण यानंतरही प्रत्येकी एकेक जागा जिंकण्यात भाजपा आणि काँग्रेस यशस्वी झाले. राज्यसभेच्या 72 जागांसाठी यावर्षी तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 37 जागांसाठी निवडणूक झाली. आता उर्वरित 35 जागांसाठी येत्या काही महिन्यांत दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर आहे, भाजपाची राज्यसभेत हळूहळू स्वबळावर बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. रालोआ म्हणून भाजपा आजच राज्यसभेत बहुमतात आहे, पण स्वबळावरील बहुमतासाठी भाजपाला आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
राज्यसभेची सदस्यसंख्या 245 असते, यातील 233 सदस्य निर्वाचित असतात, तर 12 सदस्य नामनियुक्त असतात. 245 सदस्यांच्या सभागृहांत बहुमतासाठी 123 जागांची आवश्यकता आहे, पण भाजपाचे सध्याचे संख्याबळ 107 आहे. त्यामुळे भाजपा आता स्वबळावरील बहुमतापासून फक्त 16 पावलं दूर आहे. गणिती भाषेत पाहिले तर या निवडणुकीमुळे रालोआचा 10 जागांचा फायदा झाला, तर विरोधकांचे दहा जागांचे नुकसान. रालोआच्या जागा 12 वरून 22 झाल्या तर विरोधकांच्या 25 वरून 15 वर आल्या. निवडणुकीच्या आधी भाजपाजवळ 9 जागा होत्या, त्या 13 झाल्या, म्हणजे भाजपाचा 4 जागांचा फायदा झाला, तर काँग्रेसच्या जागा 4 वरून सहावर पोहोचल्या, म्हणजे काँग्रेसलाही दोन जागा जास्तीच्या मिळाल्या. जदयुला आपल्या दोन जागा कायम ठेवण्यात यश आले, तर राजदला आपल्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. बिहारमध्ये भाजपाची एकही जागा नसताना दोन जागा भाजपाने जिंकल्या. तृणमूल काँग्रेस आपल्या चार जागा कायम ठेवण्यात यशस्वी ठरली, तर चार जागा असणाèया द्रमुकला यावेळी फक्त 3 जागा जिंकता आल्या, म्हणजे त्यांचे एका जागेचे नुकसान झाले. तीच स्थिती शिवसेना उबाठाची झाली. या पक्षाजवळ एक जागा होती, ती शून्यावर आली. माकप आणि भारत राष्ट्र समितीलाही आपली जागा गमवावी लागली. बिजू जनता दलाजवळ दोन जागा होत्या, त्यांना एक जागा मिळाली, म्हणजे त्यांचे एका जागेचे नुकसान झाले.
महाराष्ट्रातील सातही जागांवरील उमेदवार अविरोध विजयी झाले. यात भाजपाच्या 4, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश होता. निवडणुकीच्या आधी राज्यसभेतील भाजपा सदस्यांची संख्या 103 होती, 9 सदस्य निवृत्त झाल्यामुळे भाजपाचे संख्यबळ 94 वर आले होते, पण यावेळी 13 जागा जिंकल्यामुळे भाजपा 107 वर पोहोचली आहे. भाजपाची राज्यसभेतील ही सर्वांत जास्त सदस्यसंख्या आहे. 2014 मध्ये सत्तेवर आली तेव्हा, भाजपा राज्यसभेत अल्पमतात होती. त्यामुळे अनेक विधेयके राज्यसभेत पारित करून घेण्यात भाजपाला अडचण येत होती. काही वर्षांपासून राज्यसभेत भाजपाची ताकद वाढत गेली. रालोआ तर बहुमतात आली, त्यामुळे भाजपाच्या अडचणी कमी झाल्या. राज्यसभेतही विधेयके सहजपणे पारित होऊ लागली.
राज्यसभेत रालोआ आणि इंडिया आघाडी व्यतिरिक्त या दोन्ही आघाड्यांत नसणारेही म्हणजे एकला चलो रेचा मार्ग पत्करणारे काही पक्ष आहेत. या सर्वांचे एकत्रित संख्याबळ 28 आहे. यात आम आदमी पक्षाचे (आप) 10, वायएसआर काँग्रेसचे सात, बिजू जनता दलाचे 6, भारत राष्ट्र समितीचे 3 तर बसपा आणि मिझो नॅशलन फ्रंटचा प्रत्येकी एक सदस्य आहे. यावेळच्या राज्यसभा निवडणुकीने देशातील अनेक राजकीय पक्षांची समीकरणे बदलणार आहेत. या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बिहारमधून राज्यसभेवर निवडून आले.rajya sabha election results राज्यसभेत आता माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विद्यमान अध्यक्ष नितीन नवीन असे भाजपाचे दोन आजी-माजी अध्यक्ष जवळजवळ असतील. भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेत आहेत. आतापर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा राज्यसभेत सत्ता पक्षनेते होते, तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे विरोधी पक्षनेते आहेत. नड्डांप्रमाणे भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेत सत्तापक्ष नेते होण्याची शक्यता नाही.
राज्यसभेत येण्यासाठी नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली, हे या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नितीशकुमार राज्यसभेत आल्यामुळे आता बिहारमध्ये सत्ताबदल होण्याचा आणि भाजपाच्या मुख्यमंत्र्याने शपथ घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उत्तर भारतातील बिहार हे एकमेव असे राज्य होते, ज्याठिकाणी अनेक वर्षं सत्तेत सहभागी असूनही कधी भाजपाचा मुख्यमंत्री झाला नाही. बिहारचे नितीन नवीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पायगुणाने बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री पदारूढ होण्याची परिस्थिती निर्माण झाली.
राज्यसभा निवडणुकीने आणखी एक बदल घडवला तो म्हणजे नितीशकुमार यांचा मुलगा निशांतकुमार यांचे राजकारणात पदार्पण झाले आणि नितीशकुमार यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांची प्राणप्रतिष्ठा होण्याचा मार्ग मोकळा झाला. निशांतकुमार बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता नसली तरी उपमुख्यमंत्री मात्र निश्चितपणे होऊ शकतात. घराणेशाहीच्या राजकारणाचा ठपका टाळण्यासाठी नितीशकुमार यांनी आतापर्यंत निशांतकुमारला राजकारणापासून दूर ठेवले होते.
या निवडणुकीने राज्यसभेतील उपाध्यक्षपदही रिकामे होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष हरिवंशनारायणसिंह यांना जदयुने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर नव्या उपाध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यसभेला जसे नवे अध्यक्ष मिळाले, तसेच नवे उपाध्यक्षही मिळणार आहेत. त्यामुळे यावेळची राज्यसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आणि महत्त्वपूर्ण ठरली आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817