तरुण भारताचा शताब्दीपूर्ती सोहळा थाटात

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
नागपूर,
tarun bharat centenary celebrations ‘तरुण भारत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेला विशेष सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित ‘अविरल’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसंघाच्या स्वयंसेवकावर आधारित कॉफीटेबल बुकचेही विमोचन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत तरुण भारताच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेछया दिल्या.
 
bharat
 
 
 
दरम्यान संपादक शैलेश पांडे आणि राजाराम वाचनालयाचे सचिव रवी देशपांडे यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची घेतलेली मुलाखत आणि विविध विषयांवर सखोल चर्चा उपस्थितांच्या पसंतीला पडली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने अनेकांनी घरी बसूनही या सोहळ्याचा आनंद घेतला. याचबरोबर ‘तरुण भारत’च्या जुन्या अंकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शनही मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनातून वाचकांना वृत्तपत्राच्या समृद्ध परंपरेची झलक पाहायला मिळाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
 
 
जीवनात वाचलेलं पहिले वृत्तपत्र म्हणजे ‘तरुण भारत’  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीवनात वाचलेलं पहिले वृत्तपत्र म्हणजे ‘तरुण भारत’ आहे. एखादी सामाजिक चळवळ 100 वर्षांचा टप्पा गाठते, तेव्हा तिच्या मागील वैचारिक अधिष्ठानच त्या यशाचे खरे कारण असते. ‘तरुण भारत’ने आजवर हेच अधिष्ठान सातत्याने जपले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विचारांचे जतन, संवर्धन आणि ते समाजापर्यंत परखडपणे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दैनिकाने सातत्याने केले आहे. ज्या ध्येयाने ‘तरुण भारत’ कार्यरत आहे, त्या उद्देशाची पूर्तता या दैनिकाने प्रभावीपणे साध्य केली आहे.पुणे येथूनही ‘तरुण भारत’ची आवृत्ती सुरू झाली असून, तेथेही या दैनिकाला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.