इस्लामाबाद,
22 killed in PoK इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतर आशियामध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक प्रमुख नेते तसेच लष्करी कमांडर मारले गेले आहेत. या घटनांनंतर अनेक देशांनी अमेरिकेला पाठिंबा दर्शविला, तर इराणवर हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत.पाकिस्तानमध्येही या तणावाचा परिणाम दिसून आला आहे. इराणच्या समर्थनार्थ सुरु केलेल्या निदर्शनांमध्ये किमान २२ जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृत्यूची आणि जखमी होण्याची घटना पाकिस्तानातील कराची तसेच गिलगिट-बाल्टिस्तान या पीओकेच्या भागांमध्ये घडली.

कराची आणि देशाच्या उत्तरेकडील भागात निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष झाला. रविवारी, इराणी सरकारच्या समर्थनार्थ निदर्शकांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, उत्तर पाकिस्तानमधील निदर्शकांनी संयुक्त राष्ट्र कार्यालये आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले केले.कराचीमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० जण जखमी झाले. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास ८० जण जखमी झाले.
पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने नागरिकांना सल्ला दिला आहे की स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सुरक्षिततेचे उपाय पाळावेत. तसेच, अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या STEP नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. या घटनांमुळे पाकिस्तानमध्ये सामाजिक आणि राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दल सतत पाळत आहेत.