काल नियुक्त झालेल्या इराणचा सर्वोच्च नेत्यांचाही मृत्यू?

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
तेहरान,
Ali Reza Arafi also died अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. इस्त्रायलच्या मदतीने अमेरिकेकडून इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा करण्यात येत आहे. राजधानीसह अनेक प्रमुख शहरांवर लक्ष्य साधण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या घडामोडींमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यानंतर लगेचच अली रजा अराफी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र अमेरिकेकडून अराफी यांनाही हल्ल्यात ठार केल्याचा दावा करण्यात आल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. या दाव्याबाबत इराणकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नसून त्यांनी आपल्या लष्करी तयारीचे दर्शन घडवणारे दृश्य प्रसिद्ध केले आहे.
 
  
 
 
इराणमध्ये नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारच्या समर्थनार्थ निदर्शने करत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, इस्त्रायलच्या अणुऊर्जा केंद्रावर मोठा स्फोट घडवून आणल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नव्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा झाल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी इस्त्रायलचे मोठे नुकसान झाल्याचे आणि शंभर सैनिक ठार झाल्याचे विधान इराणकडून करण्यात आले आहे. या युद्धाचे पडसाद आखाती देशांपर्यंत उमटताना दिसत असून दुबईसारख्या व्यापारी केंद्रांवरही त्याचा परिणाम होत आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना परिस्थिती अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगभरातील देश या संघर्षाकडे चिंतेने पाहत असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.