पीडीएमसीला क्यूसीआयची मान्यता

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
शिवाजी संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती, 
Approval of PDMC by QCI श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (पीडीएमसी) नवी दिल्ली येथील क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) या राष्ट्रीय संस्थेची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ही मान्यता महाविद्यालय व रुग्णालयासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
 
 
qcr
 
Approval of PDMC by QCI क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरील मान्यता देणारी संस्था असून रुग्णालयातील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीत सातत्यपूर्ण सुधारणा, जोखीम कमी करणे, रुग्णांची सुरक्षितता वाढविणे, सेवेचे प्रमाणीकरण करणे तसेच कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणे या उद्देशाने संरचित व परिणामकारक पद्धतीने काम करण्यावर भर दिला जातो. या मान्यतेमुळे रुग्णांचा रुग्णालयावरील विश्वास अधिक दृढ होतो, संस्थेची प्रतिष्ठा वाढते, राष्ट्रीय मानकांचे पालन सुनिश्चित होते, तसेच संलग्नित व मान्यताप्राप्त रुग्णालयांच्या यादीत संस्थेचे नाव समाविष्ट होते. याशिवाय पारदर्शक कार्यपद्धती, कामगिरीचे मूल्यांकन व संभाव्य आर्थिक प्रोत्साहन यांसारखे लाभही मिळतात. सुरक्षितता, परिणामकारकता, रुग्णकेंद्रित सेवा, समयसूचकता, कार्यक्षमता आणि समानता ही आरोग्य सेवेतील गुणवत्ता व्यवस्थापनाची सहा महत्त्वाची क्षेत्रे मानली जातात. क्यूसीआयचे प्रमाणपत्र अशा वैद्यकीय संस्थांना प्रदान केले जाते, जिथे दर्जेदार औषधोपचार, उत्तम रुग्णसेवा आणि सर्व सुविधा उच्च मानकांनुसार उपलब्ध असतात. ही मान्यता प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे, उप-वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोमेश्वर निर्मळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. शिवाजी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी क्यूसीआय मान्यता प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.