मध्यरात्री पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी तळांवर हल्ले!

तालिबानचा दावा

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Attacks on Pakistani military bases मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असताना त्याचे पडसाद शेजारील देशांमध्येही उमटू लागले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त कारवाई केल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बिघडली. इराणवर सलग हवाई हल्ले करण्यात आले आणि तेहरानसह अनेक मोठ्या शहरांना फटका बसला. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनांनंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेची लष्करी तळे असलेल्या अनेक देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. आखाती प्रदेशातील काही शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
Pakistani military base
 
दुबई विमानतळही निशाण्यावर आल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि चीनने या वाढत्या तणावात संयम राखण्याचे आणि युद्ध थांबवण्याचे आवाहन केले असले, तरी परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही वाढला आहे. अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या लष्करी तळांवर यशस्वी हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे.
 
रावळपिंडीतील नूर खान हवाई तळ, क्वेट्टा येथील बारावी कोर, तसेच खैबर पख्तूनख्वा आणि घेलानी येथील लष्करी ठिकाणे लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत एक व्हिडीओही प्रसारित करण्यात आला आहे. तथापि, या दाव्यांवर पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरीही या घडामोडींमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण प्रदेशात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे.