हिंदूनी पंचपरीवर्तनाचा विचार अंगिकारल्यास भारत विश्वगुरुपदी : प्रशांत देशमुख

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
*चैतन्यवाडी भागाचे विशाल हिंदू संमेलन
बुलढाणा, 
buldana  hindu Sammelan १९२५ पासून रा.स्व. संघ हिंदूमध्ये भारतीय संस्कृती रुजविण्याचे कार्य करीत आहे. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाले असून शताब्दीच्या या वर्षात सर्वत्र हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदूनी समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी, नागरी कर्तव्य या पंचपरीवर्तनाचा विचार अंगिकारल्यास भारत विश्वगुरु पदी पोहचल्याशिवाय राहणार नाही. हिंदूनी आपल्या घरापासून या पंचपरीवर्तनाला सुरवात करावी असे आवाहन अ. भा.वि.प. चे प्रांत कार्यकरणी सदस्य प्रा. प्रशांत देशमुख यांनी केले. चैतन्यवाडी भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. १ मार्च रोजी राधा गोविंद मंगल कार्यालय या ठिकाणी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महानुभव पंथाचे आचार्य रिद्धपूरकर बाबा शास्त्री तर महिला प्रतिनिधी मेघा किरण चौधरी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून प्रा. प्रशांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गृहसंपर्क अभियान, विशाल हिंदू संमेलन अशा विविध कार्यक्रमाना हिंदू समाजाने भरभरून सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
 
 
hdkslsdk
 
विशाल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने चैतन्यवाडी, लांडे ले आऊट, विष्णूवाडी या भागातून दिंडी काढण्यात आली. या दिंडीत मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. टाळ मृंदगाच्या निनादात फुगड्या खेळत या दिंडीचा राधा गोविंद मंगल कार्यालयात सांगता झाली. तसेच प्रारंभी गोमातेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या विशाल हिंदू संमेलन कार्यक्रमात मान्यवरांच्या भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शारदा संगीत विद्यालयाच्या नलिनी वरणगावकर यांच्या संचाने छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार हे गीत सादर केले. तसेच विविध महापुरुषांच्या वेशभूषा या दरम्यान सादर करण्यात आल्या.
 
 
buldana hindu Sammelan  या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने चैतन्यवाडी भागातील ५० जोडप्यांनी भारत माता व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली. यामुळे संपूर्ण परीसर हा भक्तीमय होऊन गेला. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त संकल्प घेण्यात आला. या निमित्ताने महानुभव पंथ चे आचार्य रिद्ध पूरकर बाबा शास्त्री म्हणाले की, राष्ट्रीय स्वंसेवक संघ हा गेल्या शंभर वर्षापासून व्यक्ती घडविण्याचे व समाजात शांतता निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत असून देशाचा तारणहार म्हणून संघाची वाटचाल सुरु आहे. या निमित्ताने महिला प्रतिनिधी मेघा चौधरी यांनी महिलांनी आपल्या कुटुंबाचे प्रबोधन कसे करावे यावरती प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक अ‍ॅड. मुणोत व अरविंद अंबूसकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन मोहन केसाळे यांनी केले. तर आभार अमित कुळकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला चैतन्यवाडी, लांडे ले आऊट, विष्णूवाडी या भागातील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.