नोकरी असल्याची खोटी कागदपत्रे दिली
अमरावती,
Fraud नौकरी असल्याचे खोटे कागदपत्रे सादर करून इंडियन बँकेच्या दोन शाखांमधून एकूण ८२ लाख रुपयांची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस असून पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. गत २३ डिसेंबर २०२५ रोजी इंडियन बँकेच्या कॅम्प शाखा व पीडीएमसी शाखेच्या व्यवस्थापकांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार भातकुली तालुक्यातील गणोरी येथील संजय दुर्योधन धंदर, शारदा संजय धंदर, सुनील ओंकारराव भटकर, प्रतीभा सुनील धंदर , तसेच अंजनगाव बारी येथील जयंता गणेश आखरे व शिराळा येथील सुरेश देविदास मोहोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस विभागाच्या आथिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
Fraud यातील संजय धंदर व सुनील भटकर निवासी मुकबधीर विद्यालय दर्यापूर येथे अनुक्रमे सहायक शिक्षक आणि वार्डन या पदावर नोकरीस असल्याबाबत तसेच शारदा धंदर ही निवासी मतिमंद विद्यालय वायगाव आष्टी येथे केअर टेकर पदावर नोकरीस असल्याचे दर्शविण्याकरिता सुरेश मोहोड याने खोटे नोकरीचे कागदपत्र, सॅलरी सर्टीफिकेट, फॉर्म नं. १६, जीपीएफ सर्टीफिकेट तयार केले व ते कागदपत्र गृहकर्जाकरिता बँकेत सादर केले. त्याचप्रमाणे आरोपींनी श्रीराम भीमराव पांडे रा. शेगाव आणि राजेंद्र प्रभाकर मुंडेगावकर या व्यक्तींच्या नावे असलेले प्लॉट खरेदी करीत असल्याबाबतची खोटी इसारचिठ्ठी आणि खोटे विक्रीपत्र तयार करून ते इंडियन बँकेत सादर करून त्याआधारे इंडियन बँकेच्या कॅम्प शाखेतून ३८ लाख रुपये आणि पीडीएमएमसी शाखेतून ४४ लाख रुपये याप्रमाणे एकूण ८२ लाख रुपये गृहकर्जाची उचल करून बँकेची फसवणूक केली. याकरिता त्यांनी श्रीराम पांडे आणि राजेंद्र मुंडेगावकर यांचे खोटे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून त्या आधारे कोटक महिंद्रा बँक, अॅक्सीस बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी तोतया व्यक्ती उभा करून बँकेत खाते उघडून त्या खात्यांचा गुन्ह्यात वापर केल्याचेही पुढे आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी ११ आरोपी निष्पन्न केले असून त्यापैकी संजय धंदर, सुनील धंदर, अतुल छापानी, सुमित गंगाप्रसाद जयस्वाल, दीपक गेंदालाल गुप्ता व रोहन आनंदराव भोपळे अशा ६ आरोपींना अटक केली असून २ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार करीत आहे.