चंद्रपूरकर महिलांची लावणी ठरली विश्वविक्रमी!

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
*वीस मिनिटात वीस लावण्यांचे सादरीकरण
* गिनिज बुकात झाली नोंद
* यापूर्वीची 33 हजार दिव्यांची आरासही होती विक्रमी

चंद्रपूर, 
Lawanya entered the Guinness Book of World Records चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजार 432 महिलांनी वीस मिनिटात वीस लावण्या सादर केल्याचा विश्वविक्रम गिनिज बुकात नोंदवला आहे. आधी हाच विक्रम हा 1 हजार 326 महिलांचा होता. त्याला मागे टाकत रविवार, 1 मार्च रोजी सायंकाळी येथील चांदा क्लब मैदानावर या महिलांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
 
 
lavani
 
उत्कृष्ट महिला मंचच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. त्यास सोमय्या इंस्टीट्यूटने सहकार्य केले. गत वर्षभरापासून चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना या उपक्रमासाठी तयार केले जात होते. चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. हैदराबाद इथूनही प्रशिक्षक बोलावून लावणीतले बारकावे शिकवले गेले. अंतिम सादरीकरणात सर्व महिलांनी नेसलेल्या गुलाबी साड्या आकर्षक दिसत होत्या. 20 मिनिटात 20 लावण्या सादर करणे, तेही मराठमोळ्या परिधानात आव्हानात्मक होते. पण हे आव्हान या महिलांनी लीलया पेलले.
 
 
Lawanya entered the Guinness Book of World Records चांदा क्लब मैदानात झालेल्या या उपक्रमाची नोंद घेऊन त्यांना जागतिक मंचावर नेण्यासाठी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या सोनिया उशिरागोची या विशेषत्वाने उपस्थित होत्या. त्यांनीच या विश्वविक्रमाची घोषणा केली. एका वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची किमया चंद्रपूरच्या महिलांनी केली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आयोजनाचे सार्थक झाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष छबू वैरागडे, साक्षी कार्लेकर, सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष पी. एस. आंबटकर, पियुष आंबटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, हॉटेल लोटसचे संचालक संदीप पोशट्टीवार प्रभृती उपस्थित होते. यापूर्वी, याच मैदानात तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंटीवार यांच्या पुढाकाराने ‘सियावर रामंचद्र की जय’ या जयघोषाची 33 हजार 258 दिव्यांची आरास केल्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला होता, हे विशेष.