पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची उच्चस्तरीय बैठक!

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
modi highlevel meeting पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या दौऱ्यानंतर रविवारी उशिरा रात्री नवी दिल्ली येथे परतताच जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. पश्चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बोलावण्यात आली होती. दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचेअध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमिरातीवर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध करत जीवित आणि वित्तहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.
 
 
modi highlevel meeting
 
या कठीण काळात भारत संयुक्त अरब अमिरातीसोबत ठामपणे उभा असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्याचप्रमाणे इस्रायलच्या नेतृत्वाशीही त्यांनी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. आतापर्यंत भारताने संघर्षात तटस्थ भूमिका राखली असली, तरी इराणकडून झालेल्या कारवायांबाबत प्रथमच स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर तणाव वाढला असून या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घडामोडींचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. आखाती देशांतील सुरक्षेची स्थिती, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर होणारे संभाव्य परिणाम यावर सखोल चर्चा झाली. त्या भागात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष चिंता व्यक्त करण्यात आली. संबंधित यंत्रणांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
 
इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारताच्या तेल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबाबतही माहिती सादर करण्यात आली. इराणमध्ये सुमारे दहा हजार, इस्रायलमध्ये चाळीस हजार तर खाडी देश व पश्चिम आशियातील इतर भागांत सुमारे नव्वद लाख भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. याआधीही संघर्षाच्या काळात भारताने विविध देशांतून आपल्या नागरिकांची सुरक्षित सुटका केली आहे. संबंधित देशांतील भारतीय दूतावास नागरिकांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.