तारापूरमध्ये केमिकल्समध्ये ऑलियम गळती, परिसरात गॅसचा फैलाव

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पालघर,
Oleum spill in chemicals in Tarapur तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भगेरिया केमिकल्समध्ये मोठी गॅस गळती झाली आहे. या गळतीत ऑलियम हवेत मिसळल्याने सल्फर डायऑक्साइड आणि इतर सल्फर ऑक्साईड तयार झाले, जे परिसरात पसरले आणि कामगार तसेच शेजारील रहिवाशांना त्रास झाला. गळती दुपारी सुमारे २ ते २:१५ या वेळेत घडली, जिथे कंपनीत ऑलियमचा मोठा साठा होता. पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे गॅस सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात पसरला.
 
 

tarapur aluminium 
सल्फर डायऑक्साइडमुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, कोरडेपणा आणि घसा खवखवण्याची समस्या निर्माण होते. घटनास्थळी तयार झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक रस्त्यावर धावताना दिसत आहेत, तर काही महिला रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष, महसूल विभाग आणि इतर यंत्रणांना सूचना दिल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले. कंपनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर परिसराजवळील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून ऑलियम गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने प्राथमिक अंदाज मांडला की कंपनीतून सुमारे एक टन ऑलियम गळत असावे. वाऱ्याच्या दिशेमुळे कॅमलिन नाका आणि टाकी नाका परिसरातील औद्योगिक व निवासी भागावर गॅसचा परिणाम झाला. तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर इतर संस्थांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे आदेश झाले. पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख घटनास्थळी पोहोचले असून गरज भासल्यास पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. सध्या गॅस गळतीमुळे कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.