रिसोडचे चार पर्यटक दुबईत अडकले

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
कुटुंबीयांची चिंता वाढली
 
रिसोड, 
मध्यपूर्वेत वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती गंभीर बनली असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे विमानसेवा ठप्प झाल्याने 'tourists from Risod'  रिसोड येथील चार पर्यटक दुबई येथे अडकून पडले आहेत. हे पर्यटक पुणे येथून पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र, अचानक उभ्या राहिलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
 
 
fisod
 
'tourists from Risod' अडकलेल्या पर्यटकांमध्ये जेष्ठ पत्रकार भगवान निर्बान, पदमाबाई भगवान निर्बान, पवन निर्बान आणि नंदा पवन निर्बान यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असले तरी तेथील परिस्थितीमुळे परतीच्या प्रवासाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. निर्बान परिवारातील सदस्य अजय निर्बान यांनी या संदर्भात आपली व्यथा मांडताना सांगितले की, ज्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत ते दुबईला गेले होते, त्या कंपनीचा करार कालच संपुष्टात आला आहे. सध्या त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही प्रमाणात माहिती मिळत असली तरी पुढील नियोजनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अनेक देशांनी आपली विमानसेवा तात्पुरती बंद केली आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती सहित विविध देशांमध्ये हजारो प्रवासी अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.
 
 
हॉटेलपासून काही अंतरावर बॉम्बस्फोट!
सध्या निर्बान कुटुंब दुबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असून, त्यांचा संपर्क रिसोड येथील कुटुंबीयांशी सुरू आहे. रिसोड येथील अजय निर्बान हे त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत. मात्र, ते ज्या परिसरात थांबले आहेत, त्या हॉटेलपासून काही अंतरावर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पवन निर्बान यांनी दिली. त्यामुळे रिसोड येथील कुटुंबीय चिंतेत पडले आहे. दुबई येथील हॉटेलमध्ये आम्ही सर्व जण सुरक्षित असल्याचेही पवन निर्बान यांनी सांगितले.
छायाचित्र - दुबईमध्ये अडकलेले पर्यटक