जय पवारांनंतर युगेंद्र पवारही आक्रमक!

विमान कंपनीवर गंभीर आरोप

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पुणे,
Yugendra is also aggressive राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर पवार कुटुंबाकडून सातत्याने कठोर कारवाईची मागणी होत आहे. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. बारामती विमानतळावर उतरताना विमान झाडाला धडकून खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अहवालातून समोर आली होती.
 
 
Yugendra
 
या प्रकरणात आता अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही समाजमाध्यमावर एक दृश्य प्रसिद्ध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या दृश्यामध्ये संबंधित कंपनीच्या विमानाचा मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर बसलेला असून उड्डाणादरम्यान झोपलेला दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. युगेंद्र पवार यांनी या प्रकाराला अत्यंत गंभीर म्हणत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठी बेपर्वाई झाल्याचा आरोप केला आहे.
 
या दृश्यासोबत त्यांनी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी, संबंधित कंपनीची सर्व विमाने तत्काळ उड्डाणबंदी करण्यात यावीत तसेच कंपनीच्या मालक व संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. यापूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही हेच दृश्य प्रसिद्ध करत कठोर कारवाईची मागणी केली होती. वडिलांना गमावल्याची वेदना व्यक्त करत त्यांनी संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीची सर्व विमाने जमिनीवर ठेवावीत आणि संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त मागणी केली होती. या घडामोडींमुळे पवार कुटुंबीय एकत्र येत न्यायासाठी लढा देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अपघाताच्या चौकशीबाबत पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.