आमरावती जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
तीन तालुक्यात मोठे नुकसान
अमरावती, 
Amravati thunderstorm and hailstorm गुरूवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंतच्या दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्ये वादळी पाऊस व गारपीट झाली. अमरावती शहरातही रात्री पावसाचे आगमन झाले. या पावसाने काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाले तर संत्रा बागांमध्ये अक्षरश : संत्राफळांचा सडा दिसून आला. अचलपूर, मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
am t
 
मोर्शी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागून असलेल्या घोडदेव परिसरात २० मार्च रोजी पहाटे ४ वाजताच्या अचानक अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागांमधील आंबिया बहार संत्रा फळे झाडांवरून गळून पडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे संत्र्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून बाजारभाव मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
चांदूर बाजार तालुक्यात गुरूवारी मध्यरात्री अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या पाऊस झाला व काही गावांमध्ये गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, गहू, संत्रा व केळी पिकांचे प्रमाणात नुकसान झाले आहे. करजगाव, तळेगाव मोहना, कुर्‍हा, लाखनवाडी, आसेगाव पूर्णा या परिसरात गारपीट झाली असून, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी प्रवीण मोहोड म्हणाले की, प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात कुठेही गारपीट झाली नसून, कुठेही शेतकर्‍यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले नाही.
 
 
Amravati thunderstorm and hailstorm  अचलपूर तालुक्यात गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास वादळी वार्‍यासह तसेच शुक्रवारी दपारी ३ वाजतापासून अचलपूर शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू झाला कालांतराने पाऊस थांबला तर दुपारी उघडून उन देखील पडले. मात्र अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांना वादळी वारा, पावसाचा जबर फटका बसला आहे . तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रात्री जोरदार वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी आल्या, तसेच शुक्रवार दुपारी तीन चारच्या दरम्यान परत पाऊस सुरू झाला. गहू व हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे. अवकाळी पावसामुळे या पिकावर विपरित परिणाम झाला आहे. वादळी वार्‍याने आंब्याचेही चांगलेच नुकसान झाले आहे. आंबा बागेत झाडांच्या खाली कैर्‍यांचा सडा पडला आहे. ऐन गव्हाच्या उंबी भरण्याच्या वेळी पाऊस आल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील गहू पूर्णतः झोपल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे .
(एएम २० एमआर - गारपीट : मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांमध्ये संत्राफळांचा असा सडा पडला आहे)