कोण आहे ‘कॅप्टन’ अशोक खरात?

नाशिक भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक आरोप

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat captain स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिष म्हणून सादर करत मोठमोठ्या राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगण्याचा दावा करणारा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ खरात सध्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या तथाकथित भोंदूबाबाच्या कथित कारवायांचा पर्दाफाश होऊ लागला असून, राज्यभरात खळबळ उडाली आहे.
 

Ashok Kharat captain 
काय आहे प्रकरण?
नाशिक क्राइम ब्रांचच्या युनिट-१ ने मोठी कारवाई करत अशोक खरात याला अटक केली. एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
अशोक खरात हा केवळ एक सामान्य ज्योतिष नव्हता, तर तो स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवत होता आणि ग्रह-ताऱ्यांच्या आधारे लोकांचे भविष्य बदलण्याचे दावे करत होता. महाराष्ट्रातील अनेक प्रभावशाली व्यक्ती त्याचा सल्ला घेत असल्याचे बोलले जाते. पोलिसांच्या छाप्यामध्ये सापडलेल्या पुराव्यांनी या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. तपासादरम्यान ५८ अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हे व्हिडिओ काही महिला आणि कथित सेलिब्रिटींशी संबंधित असू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील तपास अद्याप सुरू असून, अधिकृत माहिती येणे बाकी आहे.अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका मंदिर ट्रस्टशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. या माध्यमातून त्याने स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण केला आणि ‘आध्यात्मिक मार्गदर्शक’ म्हणून स्वतःची प्रतिमा उभी केली. यामुळे सामान्य नागरिकांपासून ते राजकीय वर्तुळातील व्यक्तींशी त्याचे संबंध निर्माण झाले.
 
 
विशेष तपास पथक नियुक्त झाले
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी ) नियुक्त केले आहे. महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. जप्त डिजिटल पुरावे आणि व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार आहे. न्यायालयाने अशोक खरात याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. भोंदूबाबाशी संबंधित काही व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
 
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप केले. त्यांनी सांगितले की, चाकणकर खरात यांना पाठीशी घालत होत्या आणि तंत्र-मंत्र करणे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन आहे.अंधारे यांनी तीन मागण्या केल्या – चाकणकर यांना अध्यक्षपदावरून हटवणे, चाकणकर आणि खरात यांची समोरासमोर चौकशी आणि नार्को टेस्ट करणे, तसेच कॉल डिटेल्स तपासणे. या नव्या आरोपांमुळे प्रकरण आणखी गंभीर झाले असून, राजकीय वातावरण तापले आहे.