- खा. प्रफुल्ल पटेल यांचे कॅप्टन खरात प्रकरणी वक्तव्य
गोंदिया,
महाराष्ट्रात गाजत असलेल्या 'Bhondubaba case' भोंदूबाबा प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली असताना, गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. कोणाचे फोटो कोणासोबत आहेत, यावरून एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही; मात्र तपासातून जे सत्य समोर येईल, त्यानुसार पक्षांतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत खा. प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.
ते शुक्रवार २० मार्च रोजी गोंदिया येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय समाधान शिबिरात सहभागी होण्याकरिता आले असता आपल्या रामनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. नाशिक येथील स्वयंघोषित बाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे. महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग यासारख्या गंभीर आरोपांमुळे हा मुद्दा राज्यभर गाजत आहे. पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, काही महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या व्हिडिओंमध्ये त्या अशोक खरात यांच्यासोबत दिसत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे.
'Bhondubaba case' याच संदर्भात गोंदिया येथे त्यांना विचारणा केली असता खा. प्रफुल पटेल म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा विविध लोकांशी संपर्क येत असतो. समाजात वावरताना अनेकांशी उठबस होते, मात्र, कोणाचे नाव अशा प्रकरणांमध्ये येणे हे निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सखोल तपास होणे आवश्यक आहे, या प्रकरणात कोणाचाही दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, या संदर्भात पक्षातील इतर वरिष्ठ नेते, सोबतच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी गोंदिया येथील निवासस्थानी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला. नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तात्काळ दखल घेत संबंधित विभागीय अधिकार्यांशी संपर्क साधून समस्यांचे निराकरण केले. तसेच प्रलंबित असलेल्या प्रश्नांना लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.