भारत ते अफगाणिस्तानपर्यंत अचानक ढगांच्या रांगा!

अनपेक्षित पावसाने चक्रावले शास्त्रज्ञही

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Clouds from India to Afghanistan भारतापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे शास्त्रज्ञांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने तापमानात मोठी घट झाली असून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. हीच परिस्थिती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही दिसून येत असून, या तिन्ही देशांमध्ये एकाच वेळी समान हवामान प्रणाली सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Clouds from India
हजार किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, या संपूर्ण बदलामागे सक्रिय वातावरणीय प्रवाह आणि पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान प्रणालींचा मोठा वाटा आहे. उत्तर पाकिस्तानच्या वरच्या थरात तयार झालेल्या चक्रीय हवामान प्रणालीमुळे या संपूर्ण प्रदेशात ढगांची हालचाल वाढली असून पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानपासून भारतापर्यंत सुमारे हजार किलोमीटर लांबीचा सलग पावसाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे या भागात एकाच वेळी पाऊस आणि गारपीट होत आहे. मार्च महिन्यात सामान्यतः उन्हाळ्याची चाहूल लागते, मात्र यंदा उलट चित्र दिसत आहे. अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही भागांमध्ये गारपीट होत असल्याने हवामानातील हा बदल नैसर्गिक नसून काही मोठ्या प्रक्रियेचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. तापमान ७ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे अनेक ठिकाणी थंडीची लाट परतली आहे.
हिवाळ्यातील घटना मार्चमध्येच झाली
सामान्यतः अशा प्रकारची हवामान प्रणाली हिवाळ्यात सक्रिय होते, परंतु यंदा ती मार्च महिन्यात दिसून येत आहे. त्यामुळे केवळ पाऊसच नव्हे तर जोरदार वारे आणि काही ठिकाणी हिमवृष्टीही होत आहे. या अनोख्या परिस्थितीमुळे हवामानतज्ज्ञही गोंधळात पडले आहेत, कारण ही घटना नेहमीच्या हवामान चक्रापेक्षा वेगळी आहे.या बदलामुळे वायव्य भारतात मेघगर्जनेसह गारपीट आणि जोरदार वारे वाहत आहेत. तसेच पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हवामान प्रणालीला आवश्यक ओलावा भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन आखातातून मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. या महासागरांमधून बाष्पीभवन होऊन तयार झालेला ओलावा हवामान प्रणालीला बळ देत असून, त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढत आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे हवामानातील बदलांचे संकेत अधिक ठळक होत असून, पुढील काळात अशा अनपेक्षित हवामान घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.