सभागृहाला डावलून चारचाकी वाहनाची निविदा

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
देवळी, 
Deoli Municipal Council देवळी नगर परिषदेत सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून अध्यक्ष, सदस्य व मुख्याधिकार्‍यांमध्ये कलगीतुरा रंगतो आहे. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या विषयांव्यतिरिक्त, मुख्याधिकार्‍यांनी परस्पर एक चारचाकी वाहन पुरविण्याबाबत नवीन निविदा प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे आरोप होत आहेत.
 
 
deoli
 
या गंभीर प्रकारामुळे सभागृहाची दिशाभूल झाली असून नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी वामन्थी सी. यांच्याकडे धाव घेत दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या १७ फेब्रुवारी रोजी देवळी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या विषय सूचीमधील विषय क्रमांक ३ नुसार आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी विविध विभागांच्या कामांसाठी वार्षिक निविदा मागवण्यावर चर्चा करण्यात आली. सभागृहात चर्चेनंतर १५ निविदांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. मात्र, ४ मार्च २०२६ रोजी एका वृत्तपत्रात नगर परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेत सभेच्या विषय सूचीत नव्हता. जाहिरातीच्या अनुक्रमांक २ मध्ये नगर परिषद कार्यालयीन कामकाजाकरिता चालकासह, डिझेल/पेट्रोलसह चारचाकी वाहन पुरवठा करण्याबाबत निविदा मागवण्यात आली आहे.
 
 
Deoli Municipal Council  मुख्याधिकारी मुख्यालयी राहत नसताना चारचाकी वाहन मागवल्याने ते आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. देवळी नगर परिषद ‘क’ वर्ग असून सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशा परिस्थितीत सभेच्या अजेंड्यावर विषय नसताना सभागृहाला अंधारात ठेवून वाहनाची निविदा स्वतःच्या स्वाक्षरीने परस्पर प्रसिद्ध करण्यात आल्याने चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे