गोपुरी—साटोडा मार्गासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
Gopuri-Satoda Marg गोपुरी चौक ते साटोडा या मार्गाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. अपूर्ण कामामुळे या रस्त्याने ये-जा करणार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी आज शुक्रवार २० रोजी पंसचे माजी सदस्य डॉ. बाळकृष्ण माऊसकर यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
 
 
andolan
 
Gopuri-Satoda Marg  गोपुरी चौक ते साटोडा चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम अडीच वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तर सध्या हे काम पूर्णपणे बंद आहे. या मार्गावरील रहदारीत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. गोपुरी व नालवाडी परिसरातून महामार्गावर जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅटरची नेहमीच वर्दळ राहते. समस्या निकाली निघावी म्हणून अधिकार्‍यांना निवेदनं दिले. मात्र, अधिकार्‍यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. प्रशासनाचे या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता आलोडी येथील मोठ्या पुलाजवळ नागरिकांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच अधिकार्‍यांनी आंदोलन स्थळ गाठून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. आंदोलनात अजय जानवे, माजी सरपंच गौरव गावंडे, माजी सरपंच गणेश ढवळे, संदीप मारवाडी, दीपक भुते, विनोद सायरे, नरेश होनाडे, विपीन कठाणे, राहुल ढोक, पंकज वालदे, संदीप मडावी, महेश अणकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.