सिडनीतील मशिदीत ईदच्या दिवशी पंतप्रधानांना विरोध!

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
सिडनी,
Protest against Australian PM in mosque ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात ईदच्या दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सिडनीतील एका मशिदीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज गेले असताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला आणि तेथून बाहेर पडावे लागले. ईदच्या नमाजासाठी त्यांना देशातील मोठ्या मशिदींपैकी एका मशिदीत आमंत्रित करण्यात आले होते. मुस्लिम समुदायाशी संवाद साधण्याच्या उद्देशाने त्यांनी ही भेट दिली होती. मात्र, मशिदीत भाषण सुरू असतानाच काही उपस्थितांनी विरोध सुरू केला आणि पंतप्रधानांवर जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री टोनी बर्क हे देखील उपस्थित होते. उपस्थित लोकांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली.
 
 

Protest against Australian 
 
या गोंधळात पंतप्रधानांना तातडीने तेथून बाहेर पडावे लागले. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी बाजूला काढले, मात्र नंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियातील मुस्लिम समाजातील काही घटक सरकारच्या गाझा संघर्षावरील भूमिकेबद्दल नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर मशिदीच्या व्यवस्थापनाने पंतप्रधानांना दिलेले आमंत्रण योग्य असल्याचे सांगितले असून, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेनंतरही पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, आपले मत मांडताना त्यांनी संयम राखल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सिडनीतील त्या भागात चर्चेला उधाण आले असून, विविध स्तरांवर या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत.