रांचीतील कॅप्टन राकेश रंजन यांचे होर्मुझमध्ये निधन

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
रांची,
Rakesh Ranjan passes away in Hormuz होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावपूर्ण परिस्थितीत एका भारतीय कॅप्टनचा जहाजावरच मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. झारखंडमधील रांची येथील रहिवासी कॅप्टन राकेश रंजन हे ‘अवाना’ या तेलवाहू जहाजावर सेवा बजावत होते. १८ मार्च रोजी जहाजावर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 

Hormuz 
मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज २ मार्चपासून होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत होते. घटनेच्या वेळी ते अत्यंत संवेदनशील भागातून बाहेर पडण्याच्या अगदी जवळ, सुमारे ५० सागरी मैल अंतरावर होते. मात्र त्या परिसरातील तणाव आणि परिस्थितीमुळे त्यांना तातडीने बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे वैद्यकीय मदत वेळेत मिळू शकली नाही आणि दुर्दैवाने कॅप्टन रंजन यांचा जीव गेला.कॅप्टन रंजन यांच्या मोठ्या भावांनी, उमेश कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या भावाची प्रकृती बिघडली तेव्हा मदत मिळू शकली नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सध्या दुबई येथे नेण्यात आला आहे.
 
कुटुंबीयांनी सरकारकडे मागणी केली आहे की, कॅप्टन रंजन यांचा मृतदेह भारतात आणण्यात यावा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला अंतिम दर्शन घेता येईल. या घटनेनंतर त्यांच्या गावात आणि कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे. कॅप्टन राकेश रंजन हे मूळचे बिहारमधील नालंदा येथील असून गेली अनेक वर्षे ते रांची येथे वास्तव्यास होते. त्यांनी सुमारे २४ वर्षे सागरी क्षेत्रात सेवा बजावली होती आणि विविध जहाजांवर काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण अनुभव मिळवला होता.