राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा...अनेक भागांत वादळी पाऊस आणि गारपीट

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
मुंबई
Unseasonal rains lashed the state राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल दिसून येत असून अवकाळी पावसामुळे अनेक भागांना फटका बसत आहे. उन्हाचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटही होत असल्याने जनजीवनावर परिणाम होत आहे. जालना, वाशीम, नाशिक आणि पुणे या भागांत वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारांचा मारा झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. आजही याच भागांत वाऱ्याचा वेग वाढत पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने इशारा दिला आहे. उर्वरित भागांतही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.
 
 

Unseasonal rains 
 
विदर्भ आणि मराठवाड्याकडे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने वातावरण अस्थिर बनले आहे. त्यामुळे अचानक ढगांची गर्दी होऊन पाऊस कोसळत आहे. काही भागांत तापमानातही चढ-उतार दिसून आला. वाशीममध्ये ३८ अंशांहून अधिक तापमान नोंदले गेले, तर जळगाव आणि अकोल्यातही उष्णता कायम होती. दुसरीकडे धुळे येथे तापमान लक्षणीयरीत्या खाली आले. या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. विशेषतः फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हाताशी आलेले उत्पन्न पावसामुळे नष्ट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.