नाशिक,
chairman of the State Women's Commission नाशिकमधील तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद सध्या रिक्त झाले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन अध्यक्ष कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अशोक खरात याच्यावर महिलांची फसवणूक व शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तपासादरम्यान त्याचे अनेक जुने प्रकार उघडकीस आले असून, त्याच्याशी काही राजकीय व्यक्तींचे संबंध असल्याचेही समोर आले. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे त्याच्याशी असलेले संबंध चर्चेत आले. त्यांच्या काही छायाचित्रांचा प्रसार झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली. त्यांनी आपला त्या संस्थेशी संबंध असल्याचे मान्य केले, मात्र त्याच्या गैरकृत्यांबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. तरीही वाढत्या दबावामुळे त्यांना अखेर पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या संपूर्ण घडामोडीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी कठोर भूमिका घेत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारयांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. दरम्यान, आता महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षपदासाठी दोन महिला नेत्यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. वैशाली नागवाडे आणि प्रतिभा शिंदेयांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. या दोघांपैकी एका नेत्याला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.