फाटलेल्या महामार्गावर सळाखीचे टाके?

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
चामोर्शी,
चामोर्शी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 या नुकताच बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अल्पावधीतच ठिकठिकाणी भेगा पडून खराब होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. करोडो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता इतक्या लवकर खराब होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यावरून कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
take
 
सध्या या रस्त्यावर गोविंदपुरजवळ जे दुरुस्तीचे काम सुरू आहे, ते पाहता जणू एखाद्या पेशन्टला टाके मारतात त्याप्रमाणे रस्त्याला ठिकठिकाणी सळाखीचे टाके मारण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. नवीन सिमेंट रस्त्याची अशी अवस्था होणे हे प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित करणारे आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्ता तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळेच अल्पावधीतच रस्त्याची ही अवस्था झाली. सार्वजनिक निधीतून तयार होणार्‍या विकासकामांमध्ये जर अशी हलगर्जीपणा व भ्रष्टाचार होत असेल, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे.
 
 
चामोर्शी-गडचिरोली हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून दररोज रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच परिसरात सुरू असलेल्या खनिज व औद्योगिक वाहतुकीमुळेही या मार्गाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत मजबूत आणि टिकाऊ रस्ता होणे अपेक्षित असताना रस्ता लवकरच खराब होणे ही नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून रस्त्याच्या बांधकामात झालेल्या त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का याची तपासणी करावी. अनियमितता व निष्काळजीपणा आढळून आल्यास कंत्राटदार व जबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी, मागणी काँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख विजय लाड यांनी केली आहे नागरिकांच्या करातून उभारल्या जाणार्‍या विकासकामांची गुणवत्ता टिकवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही विजय लाड यांनी दिला आहे.