मुंबई
Chuck Norris death हॉलिवूडमधील प्रख्यात ॲक्शन स्टार आणि मार्शल आर्ट्स तज्ज्ञ चक नॉरिस यांचे शुक्रवारी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने जागतिक चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनीही भावनिक पोस्ट शेअर करत नॉरिस यांना आपली प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.
अक्षय कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मार्शल आर्टिस्ट म्हणून मोठे होत असताना मी चक नॉरिस यांना खूप पाहिले. त्यांना पाहणे म्हणजे एखाद्या ड्रॅगनला ॲक्शनमध्ये पाहण्यासारखे होते. ते फक्त मनोरंजन नव्हते, तर शिस्त, ताकद आणि सहज दिसणाऱ्या कठीण कृतींचा संगम होता.” त्यांनी पुढे नमूद केले की नॉरिस यांच्या शैलीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला असून त्यांच्या आयुष्यातील एक भाग त्यांनी घडवला आहे.1940 साली अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे जन्मलेल्या चक नॉरिस यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकन एअरफोर्समध्ये प्रवेश केला. सेवेदरम्यान दक्षिण कोरियात असताना त्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. कराटे, तायक्वांडो आणि जूडो यांसारख्या विविध कलेत त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. 1960 च्या दशकात त्यांनी कराटे स्पर्धांमध्ये यश मिळवले आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
1972 साली त्यांनी हॉलिवूडमध्ये Chuck Norris death पदार्पण केले आणि त्यानंतर त्यांनी ॲक्शन आणि कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि अद्वितीय शैलीमुळे ते जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील रजनीकांत यांच्याइतकेच प्रभावशाली स्थान हॉलिवूडमध्ये चक नॉरिस यांना मिळाले होते, तर ब्रिटनमध्ये मिस्टर बीन या पात्राची जी ओळख आहे, तशीच ओळख नॉरिस यांची अमेरिकेत होती.चित्रपटांव्यतिरिक्त इंटरनेटवरील मीम संस्कृतीतही चक नॉरिस हे एक वेगळेच स्थान राखून होते. त्यांच्या नावावर आधारित हजारो विनोदी मीम्स आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण झालेली ही खास ओळख त्यांना नव्या पिढीतही तितकीच प्रिय बनवत होती.चक नॉरिस यांच्या निधनाने ॲक्शन चित्रपटसृष्टीतील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कामगिरीने आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाने अनेक कलाकारांना दिशा दिली असून त्यांची आठवण चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे.