नवी दिल्ली,
Delhi-Beijing flight service resumes भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, दोन्ही देशांच्या राजधानींना जोडणारी थेट हवाई सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नवी दिल्ली आणि बीजिंगयांच्यातील ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती चीनच्या दूतावासाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर चायना या विमान कंपनीकडून ही थेट सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे. काही काळापूर्वीच दोन्ही देशांतील तणाव कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर शांघाय आणि नवी दिल्ली यांच्यातील हवाई सेवा सुरू करण्यात आली होती. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता.

कोरोना काळानंतर आणि सीमावादामुळे २०२० पासून भारत-चीन दरम्यान थेट उड्डाणे थांबवण्यात आली होती. मात्र, अलीकडच्या काळात दोन्ही देशांमध्ये संवाद वाढल्याने आणि संबंध सुधारू लागल्याने पुन्हा हवाई संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.या नव्या सेवेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल, असे मानले जात आहे.दरम्यान, भारतीय विमान कंपन्याही चीनसाठी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमधील हवाई वाहतूक अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक व सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट होईल, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्यालाही नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.