नवी दिल्ली,
Husbands should share household chores सर्वोच्च न्यायालयाने विवाहातील नातेसंबंधांबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत पतीने घरातील कामांमध्ये समान सहभाग घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. स्वयंपाक, घराची स्वच्छता आणि कपडे धुणे यांसारखी दैनंदिन कामे ही केवळ पत्नीची जबाबदारी नसून पतीनेही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे खंडपीठाने सांगितले. लग्न हे जीवनसाथीसोबत असते, कोणत्याही प्रकारच्या सेवकासोबत नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने क्रूरतेच्या कारणावरून दिलेला घटस्फोटाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला होता, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने दोन्ही पक्षांमधील मतभेद मिटवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे सांगितले. संबंधित दांपत्याचे लग्न मे २०१७ मध्ये झाले असून, २०१९ पासून ते वेगळे राहत असल्याची माहिती देण्यात आली. पतीकडून घटस्फोटाची मागणी करण्यात आली होती आणि कनिष्ठ न्यायालयाने क्रूरतेच्या कारणावरून तो मंजूरही केला होता.
खंडपीठाने क्रूरतेच्या आरोपांबाबत प्रश्न विचारला असता, पतीच्या वकिलाने पत्नीच्या वर्तनावर आणि घरातील कामे न करण्यावर आक्षेप नोंदवला. यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, काळ बदलला आहे आणि घरातील जबाबदाऱ्या दोन्ही जोडीदारांनी मिळून पार पाडल्या पाहिजेत.न्यायमूर्तींनी नमूद केले की, विवाह म्हणजे परस्पर सहकार्य आणि समजुतीचे नाते असून, एकमेकांवर जबाबदाऱ्या टाकण्यापेक्षा त्या सामायिक पद्धतीने पार पाडणे गरजेचे आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.