culture and traditions आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. माहितीचा महापूर, मनोरंजनाची नवनवीन साधने येथून प्राप्त होतात आणि आपण जगाशी जोडले जात आहोत, अशा अनेक कारणांमुळे सोशल मीडियाने आपले जीवन समृद्ध केले आहे, यात शंका नाही. परंतु, या माध्यमाच्या अतिवापरामुळे आणि अनियंत्रितपणामुळे काही गंभीर सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. यातीलच एक अत्यंत संवेदनशील आणि चिंताजनक विषय म्हणजे लहान मुलांशी संबंधित अश्लील नृत्याचे व्हिडीओ, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नुकताच एक व्हिडीओ पाहण्यात आला, ज्यात एका नामांकित सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात काही मुली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यावर टॉवेलमध्ये नृत्य करीत होत्या. या कार्यक्रमाला लहान मुलेही प्रेक्षक म्हणून उपस्थित होती आणि विशेष म्हणजे, शाळेचा बॅनर मागे स्पष्ट दिसत होता.
हे दृश्य केवळ अयोग्यच नव्हते, तर ते अश्लीलतेकडे झुकणारे होते. अशी घटना केवळ याच शाळेत घडली आहे असे नव्हे, याआधीही शाळांचे असे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र बालवयात अश्लीलतेकडे झुकल्याने बालपण कसे टिकून राहील, पालकांची याकडे होणारी उदासीनता आणि ‘आधुनिकतेच्या’ नावाखाली चाललेला हा अतिरेक, यावर सखोल चिंतन करणे आज काळाची गरज आहे.
भारत हा संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. नम्रता, मर्यादा, आदर, वडीलधाऱ्यांचा मान राखणे आणि वयानुसार योग्य वर्तन करणे ही भारतीय संस्कृतीची मूलभूत तत्त्वे आहेत. बालपणीच मुलांना नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते, ज्यामुळे ते सुजाण आणि जबाबदार नागरिक बनतात. कुटुंबात आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याची जाणीव करून दिली जाते. लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते, त्यावर जे संस्कार कोरले जातात, ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. त्यामुळे त्यांच्यासमोर काय सादर केले जाते आणि त्यांना काय शिकवले जाते, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतीय परंपरेत कलेला नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे, परंतु ती कला मर्यादा आणि नैतिकतेच्या चौकटीत असावी, अशी अपेक्षा असते. आपल्या संस्कृतीत बालपण हे निरागसतेचे प्रतीक मानले जाते आणि त्याचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकावर असते. म्हणूनच शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याकडे ब्रह्मचर्याचे पालन सांगितले आहे.
जागतिकीकरणामुळे पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय समाजावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘बोल्डनेस’ आणि ‘मुक्त अभिव्यक्ती’ या पाश्चात्त्य संकल्पनांचा स्वीकार भारतीय समाजात होत आहे. अनेकदा ‘आधुनिक’ दिसण्याच्या किंवा ‘प्रगत’ असल्याचा दावा करण्याच्या नादात काही वेळा सांस्कृतिक मूल्यांची पायमल्ली केली जाते. पाश्चात्त्य संस्कृतीत काही प्रमाणात अधिक मोकळेपणा असला, तरी लहान मुलांसाठी ‘बोल्डनेस’ आणि ‘अश्लीलता’ यातील सीमारेषा स्पष्टपणे आखलेली असते. दुर्दैवाने भारतात अनेकदा या दोन्ही संकल्पनांमध्ये गल्लत केली जाते. ‘बोल्डनेस’ म्हणजे केवळ शारीरिक प्रदर्शन नव्हे, तर विचारांची आणि अभिव्यक्तीची स्पष्टता असते. परंतु, आजकाल ‘बोल्डनेस’च्या नावाखाली लहान मुलांना अश्लीलतेकडे ढकलले जात आहे, जे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. ‘डीडीएलजे’ मधील अभिनेत्री काजोलने ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्यावर केलेले नृत्य हे सोज्वळ आणि कलात्मक होते, असे म्हणावे लागेल. मात्र आताच्या व्हायरल व्हिडीओमधील नृत्यात मात्र ती सोज्वळता हरवलेली दिसते; उलटपक्षी ती अश्लीलतेकडे झुकणारी आहे. हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याच फरकामुळे बालपणाचे पावित्र्य जपले जाते.
लहान मुलांच्या संगोपनात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांनी आपल्या मुलांना योग्य-अयोग्य शिकविणे, सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल अनेक पालक ‘व्हायरल’ होण्याच्या हव्यासापोटी आपल्या मुलांच्या निरागसतेचा बळी देत आहेत. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी काही पालक आपल्या मुलांना अयोग्य कंटेंट सादर करण्यास प्रवृत्त करतात. यामुळे मुलांचे बालपण हिरावले जाते आणि त्यांना अवेळी लैंगिक किंवा अश्लील कंटेंटच्या संपर्कात आणले जाते. ‘माझं मूल किती हुशार आहे’, ‘किती बोल्ड आहे’ हे दाखवण्याच्या नादात पालक नकळतपणे आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात घालत आहेत. लहान मुलांचे मन अत्यंत कोमल असते. त्यांच्यावर अशा प्रकारच्या दृश्यांचा किंवा नृत्यांचा खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यांना लैंगिकतेबद्दल चुकीची माहिती मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. पालकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, ‘बोल्डनेस’ वगैरे मोठे झाल्यावर, वयात आल्यावर ठीक आहे, पण लहानपणी हे का हवे आहे? बालपण हा निरागसता, धम्माल-मस्ती, अभ्यास आणि नैसर्गिक विकासाचा काळ असतो. या काळात मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य अनुभव मिळणे आवश्यक आहे. त्यांना सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण देणे ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षण संस्थांची जबाबदारी केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यापुरती मर्यादित नाही, तर मुलांना नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची शिकवण देणे ही देखील त्यांची जबाबदारी आहे. शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या नावाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. ‘आधुनिकता’ किंवा ‘प्रगती’ या नावाखाली मूल्यांचा ऱ्हास करणे हे शिक्षण संस्थांसाठी योग्य नाही. ज्या ठिकाणी संस्कारांची बीजे पेरली पाहिजेत, तिथे जर अश्लीलतेचे धडे दिले जात असतील, तर ते अत्यंत गंभीर आहे. शाळा हे दुसरे घर असते, जिथे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळायला हवे. शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, कोणत्याही कार्यक्रमात मुलांच्या वयाला आणि भारतीय संस्कृतीला धरूनच कार्यक्रम सादर केले जातील. केवळ स्पर्धेत जिंकण्यासाठी किंवा ‘नवीन काहीतरी’ करण्याच्या नावाखाली मुलांच्या निरागसतेशी खेळणे हे अक्षम्य पाप आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया ही एक दुहेरी तलवार आहे. तिचा योग्य वापर केल्यास ती वरदान ठरते, अन्यथा ती शापही ठरू शकते. ‘व्हायरल’ होण्याच्या हव्यासापोटी अनेकदा मर्यादांचे उल्लंघन केले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचीदेखील या संदर्भात मोठी जबाबदारी आहे. त्यांनी अशा अयोग्य सामग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाज म्हणून आपलीदेखील जबाबदारी आहे. अशा व्हिडीओजला प्रोत्साहन न देणे, ते शेअर न करणे आणि त्याबद्दल आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय मूल्ये आणि आधुनिकतेचा समतोल साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्या संस्कृतीला आणि मूल्यांना विसरणे म्हणजे ‘आधुनिक’ होणे नव्हे, तर त्यांना जपून प्रगती करणे होय. पालक, शिक्षण संस्था आणि संपूर्ण समाजाची ही सामूहिक जबाबदारी आहे की, त्यांनी बालमनाचे संरक्षण करावे आणि त्यांना योग्य संस्कार द्यावेत. सोशल मीडिया साक्षरता वाढविणे आणि नैतिकतेचे शिक्षण देणे हे यावरचे काही महत्त्वाचे उपाय आहेत. मुलांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे शिकविणे आवश्यक आहे.culture and traditions केवळ लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मुलांच्या निरागसतेचा बळी देणे हे समाजासाठी घातक आहे. या गंभीर विषयावर समाजाने एकत्र येऊन विचार करणे आणि योग्य पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे; जेणेकरून आपल्या भावी पिढीला सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण मिळेल आणि त्यांचे बालपण खऱ्या अर्थाने फुलू शकेल.
जयेश शत्रुघ्न मेस्त्री