तासाभराचा प्रवास अडीच-तीन तासाचा

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर संताप
इतवारी-रायपूर लोकलचा खोळंबा कायम

गोंदिया, 
सर्वसामान्य प्रवाशांसाठी जीवनरेषा मानली जाणारी Itwari-Raipur Local Passenger इतवारी-रायपूर (क्रमांक 58206) ही लोकल पॅसेंजर रेल्वेगाडी आता अक्षरशः त्रासदायक ठरत असून, रेल्वे प्रशासनाच्या उदासीन व निष्क्रिय कारभारामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होताना दिसत आहे. दररोज सकाळी साडेसातच्या सुमारास इतवारीहून सुटणारी ही गाडी वेळापत्रकाच्या नावालाच धावत असल्याची स्थिती आहे. भंडार्‍यानंतर मागून येणार्‍या सुपरफास्ट व एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी या लोकलला वारंवार थांबवले जात असल्याने भंडारा ते गोंदिया हे केवळ तासाभराचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागत आहेत. ही बाब अपवादात्मक नसून, जवळपास रोजचीच ठरली आहे.
 
 
Itwari-Raipur Local Passenger
 
Itwari-Raipur Local Passenger  आज शनिवार 21 मार्च रोजी या गाडीचा विलंब कळसाला पोहोचला. गोंदिया स्थानकावर सकाळी 9.47 वाजता पोहोचण्याची वेळ असताना ही गाडी थेट दुपारी साडेबारा वाजता दाखल झाली. त्यामुळे कामावर वेळेत पोहोचणारे नोकरदार, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे कामगार, तसेच आजारी व वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे, एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देताना लोकल प्रवाशांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. सामान्य माणसासाठी असलेली लोकल गाडीच जर वेळेवर धावत नसेल, तर आमच्या अडचणींची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही वाया जात असून, प्रशासनाने केवळ कागदोपत्री वेळापत्रक न ठेवता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, प्रवाशांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

आम्ही रोज या गाडीने प्रवास करतो. वेळेवर पोहोचणे अशक्य झाले आहे. कामावर उशीर झाल्यामुळे पगारावरही परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासनाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी राजेश मेश्राम यांनी व्यक्त केली.
कोट..

लोकल गाडी ही सामान्य माणसासाठी असते, पण येथे उलट परिस्थिती आहे. एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देताना आम्हाला तासन्तास थांबवले जाते. आजारी आणि वृद्ध लोकांसाठी हा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरतो, असे मत प्रवासी सुनीता ठाकरे यांनी मांडले.

Itwari-Raipur Local Passenger  या संदर्भात रेल्वेच्या एका अधिकारी यांना विचारले असता, सदर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एक्स्प्रेस व मालगाड्यांना प्राधान्य देणे अपरिहार्य ठरते. काही वेळा सिग्नलिंग व तांत्रिक कारणांमुळे लोकल गाड्यांना थांबवावे लागते. तरीही, वेळापत्रक सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.