किडंगीपारमध्ये दारू दुकान बंदसाठी ‘एल्गार’

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
महिलांसह मुली-युवतींचा सहभाग
10 एप्रिलला रास्ता रोकोचा इशारा

आमगाव, 
Kidangipar : Liquor shop येथील नगर परिषद हद्दीतील किडंगीपार येथील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवार 20 मार्च रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. या मोर्चात महिला, पुरुष तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, शेकडो महिलांनी स्वस्फूर्तपणे सहभाग नोंदवत आंदोलनात पुढाकार घेतला.
 
 
gn
 
प्रथम सकाळी 8 वाजल्यापासून किडंगीपार येथील पाण्याच्या टाकीजवळ, बाल उद्यान, हनुमान मंदिर परिसर तसेच अंगणवाडी केंद्रात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर गावातून मोर्चा काढण्यात आला. गोंदिया रोड व आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या किडंगीपार गावातील बहुसंख्य नागरिक मजुरी, हमाली व शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. आमगावपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव स्वच्छता व सुयोग्य व्यवस्थापनासाठी ओळखले जाते. गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा व गोशाळा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.मोर्चात सहभागी महिलांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, गावाचा सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निरोगी ठेवण्यासाठी दारू दुकान बंद करणे अत्यावश्यक आहे.
 
 
 
येणार्‍या पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. मोर्चाची पूर्वकल्पना मिळाल्याने तहसील परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चादरम्यान परिसरातील अनेक दुकानेही बंद ठेवण्यात आली होती.यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी तातडीने मतदान प्रक्रिया राबवावी तसेच तोपर्यंत दुकान बंद ठेवावे, अशी मागणी केली. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 10 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
 
 
आजही धरना सुरूच
Kidangipar : Liquor shop किडंगीपार येथील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आज 21 मार्च रोजीही ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच आहे. महिला-पुरुष तसेच लहान मुले-मुली तहसील कार्यालयासमोर धरना आंदोलन करत असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.